कोल्हापूर : नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून गुरुवारी कोल्हापुरात राजकीय वारे वेगाने वाहू लागले. विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेस राजकारण करीत आहे असा आरोप करीत भाजपने काँग्रेस कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. तर काँग्रेसने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत केंद्रातील मोदी सरकार विरोधात निदर्शने केली. तर या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बहुजन वंचित आघाडीने आयोजित केलेल्या कोल्हापूर बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
नवी दिल्लीतील विद्यार्थ्यांचे आंदोलन हे कोल्हापुरातील राजकारणाचा केंद्रबिंदू बनू लागले आहे. भाजपने पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आंदोलनाच्या नावाखाली निर्माण करण्यात आलेल्या गोंधळाच्या निषेधार्थ काँग्रेसविरोधात निषेध आंदोलन केले. निषेध आंदोलनाची सुरुवात भाजपा जिल्हा कार्यालय येथून करण्यात आली. त्यानंतर भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक व कार्यकर्ते दुचाकीने व्हीनस कॉर्नर या ठिकाणी एकत्रित जमा झाले.
यानंतर घोषणाबाजी करत काँग्रेस कार्यालयाच्या दिशेने मोर्चा मार्गस्थ झाला. तो रेल्वे स्थानक परिसरात आल्यावर पोलिसांनी अडवला. कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचा निषेध केला. राहुल गांधी शरम करा,संसदेचा अपमान काँग्रेसची हीच ओळख, प्रियंका गांधी हाय हाय अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी पोलिस प्रशासन आणि कार्यकर्ते यांनी झटापट झाली. पोलीस प्रशासनाने बॅरॅकेट लावून कार्यकर्त्यांना अडवले आणि अटक करण्यात आली.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष विजय जाधव, आमदार अमल महाडिक, भाजपा माजी प्रदेश सचिव महेश जाधव यांनी आंदोलनाच्या नावाखाली देशाच्या सर्वोच्च लोकशाही संस्थांचा, संवैधानिक पदांचा आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विषयांचा अवमान होईल अशा प्रकारचे वर्तन लोकशाहीला शोभणारे नाही अशी टीका केली.
काँग्रेसची निदर्शने
जंतर मंतर दिल्ली येथे परीक्षा घोटाळा संदर्भात विद्यार्थ्यांचे शांततापूर्ण मार्गाने चालू असलेल्या आंदोलनाला सरकारने बळाचा वापर करून मोडण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये विद्यार्थ्यांना पोलीस बळाचा वापर करत अमानवी पद्धतीने मारहाण करण्यात आली. त संविधानिक पद्धतीने चालू असलेल्या आंदोलनाला सरकारने गालबोट लावले. विद्यार्थ्यांचे मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करीत कोल्हापुरात काँग्रेस पक्षाने निदर्शने केली. मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रवीण केसरकर, नगरसेवक नगरसेविका, युवक काँग्रेस, एन एस यु आय, महिला काँग्रेस, सेवादल, इंटकचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
