कोल्हापूर  : कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेकडील भागात हत्तीच्या उपद्रव वाढू लागला आहे. चंदगड तालुक्यात एका महाकाय हत्तीने मोटार हवेत फेकली. काही दुचाकीचा चक्काचूर केला. मानवी वस्तीत हत्तीने केलेल्या उच्छादामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

   न्हावेली – उमगाव मार्गावरील खळनेरकरवाडी येथे हत्तीने धुमाकूळ घातला. विराज सामंत यांच्या घरासमोरील व्हॅगनार मोटार गजराजाने हवेत भिरकावून दिली. काही अंतरावर जाऊन पडलेल्या मोटारीचा चक्काचूर झाला होता. या परिसरातील दोन ते तीन दुचाकी हत्तीने पायाखाली चिरडल्या.

  हत्तीचा चित्कार, वाहनांच्या कोसळण्याच्या आवाजाने पहाटेच्या वेळी वाडी जागी झाली. भीषण दृश्यामुळे घराबाहेर पडण्याचे साहस कोणीही केले नव्हते.

विशेष पथक तैनात

   वनविभागाचे अधिकारी तुषार गायकवाड सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला आहे. हत्तीच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. नागरिकांनी विशेषतः रात्रीच्या वेळी सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.

भीती आणि संताप

   गेल्या काही महिन्यापासून चंदगड तालुक्यात हत्ती व अन्य वन्य प्राण्यांचा वावर वाढला आहे. उभी शेतपीके, वाहने, घरे यांचे अतोनात नुकसान होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीसह संतापाची भावना आहे. वन्यजीवांकडून होणारा उपद्रव रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

जीवघेणा कायमचा उपद्रव
चंदगड तालुक्यात हत्ती, गवा आदी मान्य प्राण्यांकडून सातत्याने उपद्रव होत असतो. सिंधुदुर्ग जिल्हा, कर्नाटक हद्दीत व पुढे अनेक गावांचा प्रवास करत २५ वर्षांपूर्वी तालुक्यातील पश्चिम भागात पोहोचलेल्या हत्तीने अलीकडील काही वर्षांत आपला मोर्चा पूर्व भागाकडेही वळविला आहे. शेतीसह वाहनांवर थेट हल्ले यात पाचजणांना जीव गमवावा लागल्याने शेतकरी पुरता घाबरला असून त्याच्यापासून आपल्या शेतीचे संरक्षण करताना तो मेटाकुटीला आल्यामुळे ती शेतीच नको, अशी म्हणण्याची वेळ त्याच्यावर आली आहे.

कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील जांभेगाळी-देवराई गावाजवळील जंगलातून चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागात येत आहेत. त्यांनी हाजगोळी, कळसगादे, पाटणे, जेलुगडे, कलिवडे, हेरे, खामदळे, कानूर, पिळणी भागात नुकसान चालविले आहे.आता तर या हत्तीने आपला मोर्चा पूर्व भागाकडे वळवत चिंचणे, कामेवाडी, होसूर, कर्नाटक हद्दीतील बेकिनकरे, अतिवाड या गावात धुडगूस घातला आहे. तालुक्यातील पश्चिम भागात ऊस, केळी, रताळी या पिकांवर ताव मारायला मिळत असल्याने त्याने आपला मोर्चा या भागात कायम ठेवला आहे.

त्यानंतर पूर्वभागातील ऊस, केळी व इतर खाद्यही त्याला गोड लागल्याने त्याने आपला मुक्काम तिकडेही वाढविला आहे, पण अलीकडे त्याने शिवारातील धुडगूससोबत वाहनांवर हल्ले, बैलगाडी, ट्रॅक्टरचे नुकसान चालविले आहे. त्याचा आक्रमकपणा वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.पाटणे व चंदगड वनविभागाकडून वन्यप्राण्यांपासून शेतीच्या संरक्षणासाठी प्रयत्न केले जातात, पण हत्ती, गवे, रानडुक्कर व इतर प्राण्यांचा उपद्रव इतका वाढला आहे की, पंचनामा करण्यापलीकडे त्यांच्याकडे प्रभावी उपाययोजना नाही, असा प्रश्न संतप्त ग्रामस्थांमधून केला जात आहे.

 गव्यांचा पिलास जीवदान

   कागल तालुक्यातील उंदरवाडी येथे पाण्याच्या शोधात आलेल्या आठ गव्यांचा कळप कालव्यात पडला होता. मोठे गावे पाण्यातून बाहेर आले. पण एक पिलू कालव्यातून वाहत होते. त्याला बाहेर पडता येत नव्हते. उंदरवाडी ग्रामस्थ, वनरक्षक शरद कांबळे, राधानगरीचे बचाव पथकाने वाहत्या कालव्यातून एक वर्षाच्या पिलास बाहेर काढून जीवदान दिले.