कोल्हापूर : अमेरिका, इराण, इस्त्रायल यांचीतील युद्धछाया गडद होत असली तरी आखाती देशात पर्यटन, नोकरी निमित्त गेलेले कोल्हापूरकर सुरक्षित आहेत. सुमारे शंभरहून अधिक नागरिकांशी जिल्हा प्रशासनाचा संवाद झाला आहे. तर जॉर्जिया येथे वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी शारजामध्ये अडकले आहेत.
जिल्ह्यातील पर्यटकांचे तीन गट दुबई येथे सहलीवर गेले आहेत. हुपरी परिसरातील २५ जण, कोल्हापुरातील ५७ जण तर एका पर्यटन संस्थेच्या माध्यमातून गेलेले २५ जण असे तीन गट दुबई येथे पर्यटनासाठी गेले आहेत. या सर्वांशी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने संपर्क केला आहे.
व्हिसा वाढवला
हे सर्वजण त्यांच्या हॉटेलमध्ये सुरक्षित आहेत. यापैकी काहींच्या व्हिसाची मुदत संपत आलेली होती. केंद्र सरकारने तेथील प्रशासनाशी संपर्क साधल्यानंतर व्हिसाचीमुदत वाढवण्यात आली आहे, असे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख प्रसाद सकपाळ यांनी लोकसत्ताला सांगितले.
नोकरदार सुरक्षित
चंदगड तालुक्यातील एक युवक तेहरान येथे नोकरीसाठी गेला होता. इराणमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर तो कुवेतला जहाज मार्गे गेल्याची माहिती मिळत आहे. अन्य दोघेजण कतार येथे तर अन्य एक जण दुबई येथे नोकरीसाठी आहेत. हे सर्वजण सुरक्षित असल्याचे नियंत्रण कक्षाला कळवण्यात आलेले आहे.
माहिती संकलन सुरू
युद्धजन्य स्थितीमध्ये आखाती देशात अडकलेल्या सर्व लोकांची माहिती संकलित केली जात आहे. ती केंद्र व राज्य शासनाकडे विशिष्ट पद्धतीने पाठवण्यात आली आहे. त्यांना काही अडचण आल्यास वा त्यांना भारतात आणायचे ठरल्यास ही माहिती उपयुक्त ठरणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.
विद्यार्थी अडकले
कोल्हापूर येथील विश्व इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून जॉर्जिया येथे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले सहा मुले तसेच त्यांचा एक काळजी वाहक ( केअरटेकर) असे सात जण शारजाह मध्ये अडकले आहेत. काल विमानाने ते शारजाह येथे पोहोचले. तेथील स्थानिक प्रशासनाने विमानतळ खाली करण्याच्या सूचना दिल्यानंतर हे विद्यार्थी विमानतळ सोडून एका हॉटेलवर पोहोचले. पुणे व मुंबई येथील हे सहा विद्यार्थी प्रथमच विदेशात गेलेले आहेत. ते सर्वजण सुरक्षित असून त्यांच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे या संस्थेचे ज्ञानेश्वर भस्मे यांनी सांगितले.
दोन्ही मुले सुरक्षित
कोल्हापुरातील समीर मुजावर यांची दोन मुले कतार येथे नोकरीनिमित्त आहेत. ही दोन्ही तरुण मुले सुरक्षित आहेत. इस्लामचा पवित्र रमजान महिना असताना त्यांना अल्लाह कृपेने सुरक्षा मिळाली असल्याचे मुजावर यांनी सांगितले.
दुबईचे आकर्षण का?
दुबई हे जगातील सर्वात आकर्षक पर्यटन स्थळांपैकी एक आहे. तिथे अत्याधुनिक वास्तुकला (बुर्ज खलीफा) , आलिशान जीवनशैली , वाळवंटातील थरारक सफारी आणि खरेदीसाठी उत्तम मॉल्स आहेत. हे शहर सुरक्षितता , उत्तम पायाभूत सुविधा आणि भव्यता (पाम जुमेराह, म्युझियम ऑफ फ्युचर) यांचा सुरेख मिलाफ आहे. वाळवंटातील ‘डेझर्ट सफारी’ऊंट सवारी आणि स्काइडायव्हिंग हे खास आकर्षण मानले जाते. थोडक्यात दुबई हे आधुनिकता आणि संस्कृतीचा संगम असल्याने पर्यटकांना आकर्षित करते. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून दरवर्षी दुबईला जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे असे सूत्रांनी सांगितले.
