कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पूर्वीच्याच दिमाखात उभे केले जाईल. त्यासाठी शासनाच्या वतीने २० कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी कोल्हापूर येथे केली. येथील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला शनिवारी आग लागली. यामध्ये या ऐतिहासिक नाट्यगृहाची अपरिमित हानी झाली आहे. या घटनेची पाहणी शनिवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला त्यांच्या नावाच्या नाट्यगृहाला आग लागणे ही दुर्दैवी बाब आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल.

हेही वाचा…कोल्हापूर : केशवराव भोसले नाट्यगृह आगीचे गूढ ४८ तासांनंतरही कायम ; अनेकांवर संशयाची सुई

राजर्षी शाहू महाराज यांच्या कलासक्त नजरेतून १०९ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या वास्तूची घडणावळ पाहता ती पुन्हा होणे नाही. या नाट्यगृहाशी कोल्हापुरातील कलाकार, नागरिकांच्या भावना जोडलेल्या आहेत. नाट्यगृह जसेच्या तसे व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून त्यासाठी अनेकांचे हात मदतीसाठी पुढे आले असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

हेही वाचा…शंभरी ओलांडलेले कोल्हापूरचे ‘लंडन पॅलेस’!

या नाट्यगृहाच्या पुनर्उभारणीसाठी २५ कोटी रुपये निधीची गरज आहे. नाट्यगृहाचा ५ कोटींचा विमा उतरवलेला आहे. उर्वरित २० कोटी रुपयांची रक्कम राज्य शासन देईल. सामान्यांना न्याय देणारे आणि कलावंतांचा आदर करणारे हे सरकार असल्याने ही रक्कम लगेचच दिली जाईल. युद्धपातळीवर नाट्यगृह उभारणीचे काम पूर्ण करून कोल्हापूरकरांच्या सेवेमध्ये ते आणले जाईल. हीच केशवराव भोसले यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही त्यांनी सांगितले.