कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयातील भोंगळ कारभार बुधवारी चव्हाट्यावर आला. शिंदे गटाच्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाने आज रुग्णालयाची झाडाझडती घेतली. शिवसेना वैद्यकीय कोल्हापूर जिल्हा कक्ष प्रमुख प्रशांत साळुंखे, शहर समन्वयक विनायक जरांडे यांनी कोल्हापूर महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयाची पाहणी करून महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांना बिकट स्थिती निदर्शनास आणून दिली. रुग्णांशी संवाद साधताना रुग्णांच्या नातेवाईकांशी उद्धटपणे बोलणे, औषधे बाहेरून खरेदी करायला लावणे, अस्वच्छ स्वच्छतागृह, रुग्णांची वेळेत तपासणी होत नाही, रात्री रुग्ण नाकारणे यासह असंख्य समस्यांमुळे सावित्रीबाई फुले रुग्णालयाची गंभीर परिस्थिती झाल्याचे आढळले. हेही वाचा : राजर्षी शाहू महाराजांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करावे, हसन मुश्रीफ यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी अधिकाऱ्यांना खडे बोल डॉ. पावरा यांनी याची गंभीर दखल घेत सर्व सुविधा सुधारण्याचे आश्वासन दिले. सावित्रीबाई फुले, आयसोलेशन, पंचगंगा या महापालिकेच्या रुग्णालयांना रोज भेट देऊन तेथील सुविधांवर लक्ष केंद्रित करा, सुधारणा झाली नाही तर गय केली जाणार नाही, असे खडे बोल प्रशांत साळुंखे यांनी पावरा यांना सुनावले. साळुंखे यांनी आजचे सर्व प्रश्न महानगरपालिका प्रशासन आणि मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.