कोल्हापूर : शहराची हद्दवाढ करण्याचे शासनाने जाहीर केले असल्याने याबाबत त्वरित निर्णय घेण्यात यावा, कायदेशीर संभ्रम दूर करावा, या मागणीसाठी गुरुवारी कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती व समन्वय समितीच्या वतीने महापालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये सर्वपक्षीयांसह नागरिकांनी सहभाग नोंदवला. शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना करण्याच्या वेळापत्रकाची मुदत ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वाढवली आहे, तर राज्य निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांनी कोल्हापुरात प्रभाग रचनेचे काम विहित वेळेत पूर्ण करावे, अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. त्यामुळे काही संभ्रमाचे मुद्दे निर्माण झाले आहेत.

कोल्हापूर शहराची हद्दवाढ महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी होणार का, महापालिका – जिल्हा परिषद निवडणुकीच्या तारखा एकच असणार का, जिल्हा परिषद निवडणूक झाल्यानंतर हद्दवाढ कायद्याने सयुक्तिक ठरणार का, असे काही प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याची उत्तरे पालकमंत्री, महापालिका प्रशासक व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी द्यावीत, अशी मागणी करत उपोषण करण्यात आले. यामध्ये आर. के. पोवार, ठाकरे सेनेचे रविकिरण इंगवले, शिंदे सेनेचे किशोर घाटगे, काँग्रेसचे सचिन चव्हाण, भाकपचे सतीशचंद्र कांबळे, बाबा इंदुलकर, दिलीप देसाई यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.