scorecardresearch

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सेना ,भाजपमुळे कोंडी

शेजारच्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये भाजप स्वबळावर लढणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे.

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सेना ,भाजपमुळे कोंडी

|| दयानंद लिपारे

इच्छुकांची संख्या वाढल्याने बिनविरोधी निवडीची शक्यता कमी

कोल्हापूर : इच्छुकांची वाढती संख्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक संघर्षपूर्ण होण्याच्या दृष्टीने वाटचाल करू लागली आहे. बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न मावळला आहे. निवडणूक होणार असली तरी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी आपला निवडीचा मार्ग सोपा व्हावा असे सोयीचे धोरण अवलंबले आहे. तर दुसरीकडे दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी कंबर कसली असल्याने निवडणूक अधिकाधिक चुरशीची होत चालली आहे.

 कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला अलीकडे बरे दिवस आले आहेत. यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात आपला प्रभाव टिकवण्यासाठी संचालक मंडळात वर्णी लागावी या आकांक्षांचे धुमारे फुटले आहे. त्यातून इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाऊन निवडणूक रंग भरत आहे.

 निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला होता. प्रत्येक तालुक्यात इच्छुकांची ईर्षा पाहता हा प्रयत्न मागे पडला आहे. बँकेचे अध्यक्ष, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासमोर निवडीचा पेच निर्माण झाला आहे. त्यातून सामंजस्याचा तोडगा काढण्याच्या दृष्टीने त्यांनी खासदार संजय मंडलिक, आमदार पी. एन. पाटील, आमदार विनय कोरे यांच्या समवेत बैठक घेऊन चाचपणी केली. पाटील-कोरे यांना माजी आमदार महादेवराव महाडिक व आमदार प्रकाश आवाडे यांच्याशी चर्चा करून मार्ग काढावा असे सूचित केले आहे. महाडिक यांचा निवडीचा मार्ग सोपा आहे; तर आवाडे यांनी स्वबळावर लढण्याचा इरादा व्यक्त करून संपर्क यंत्रणा जारी केली आहे.

भाजपची आघाडी?

शेजारच्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये भाजप स्वबळावर लढणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. तेथे स्वबळ आजमावले जात असेल तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा जिल्हा असलेल्या कोल्हापुरातही ताकदीचा अंदाज घेतला पाहिजे असा एक सूर आहे. महादेवराव महाडिक, धनंजय महाडिक, भाजपला राज्यात पाठिंबा दिलेले विनय कोरे, प्रकाश आवाडे या आमदारांना सोबत घेऊन आघाडी उभारता येते का याची चाचपणी सुरू आहे. तसे झाल्यास ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असे स्वरूप घेऊन ती आणखी टोकदार होण्याची शक्यता आहे.

…तर शिवसेना स्वबळावर

या निवडणुकीत शिवसेनेला कितपत स्थान राहणार हाही वादाचा मुद्दा बनला आहे. बँकेत सध्या आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, माजी खासदार निवेदिता माने असे तीन संचालक आहेत. लोकसभा व गोकुळ निवडणुकीत शिवसेनेने मदत केली असल्याने त्याची परतफेड म्हणून जिल्हा बँकेत आणखी दोन जागा न दिल्यास शिवसेना स्वबळावर जिल्हा बँकेची निवडणूक लढवेल, असे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जाहीर केल्याने पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे पदाधिकारी स्वबळावर मैदानात उतरण्याची भाषा करीत असले तरी बँकेतील तीन संचालक आपला मार्ग कसा निर्धोक होईल या काळजीत असल्याने ते काहीच विधान करीत नाहीत. शिवसेनेतील हा छुपा वाद चर्चेला निमित्त मिळण्यास पुरेसे ठरले आहे.

काँग्रेस राष्ट्रवादी अडचणीत

या निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिलेले कोरे आणि शिवसेना यांनी आक्रमक भूमिका घेत अनुक्रमे तीन व दोन जागा मागितल्या आहेत. स्वाभिमानी संघटनेने, शेतकरी संघटनेने एका जागेचा आग्रह धरला आहे. भाजप आणि शिवसेना यांना मनाप्रमाणे जागा दिल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीची राजकीय कोंडी होणार आहे. त्यांचे संख्याबळ कमी होणार तर आहेतच शिवाय उभय काँग्रेसमधील दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची मनधरणी करणे जिकिरीचे बनणार आहे.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-10-2021 at 22:43 IST