कोल्हापूर : जिल्ह्यातील मजूर संस्थांची मातृ संस्था असलेल्या कोल्हापूर जिल्हा मजूर सहकारी संघाच्या निवडणुकीत जबरदस्त सत्तांतर झाले. माजी अध्यक्ष भीमराव नलावडे, उदय जोशी, तानाजी पोवार यांच्या नेतृत्वाखालील छत्रपती शाहू सहकार विकास आघाडीने सर्व १९ जगांवर एकतर्फी विजय मिळवत परिवर्तन घडवले.

दोनच वर्षापूर्वी संघाची निवडणूक झाली होती. यात मुकुंद पोवार यांच्या पॅनलेने एकतर्फी विजय मिळवला होता. विरोधी आघाडीचे एकमेव तानाजी पोवार विजयी झाले होत. चारच वर्षात मुकुंद पोवार यांच्या आघाडीतील नऊ संचालकांनी राजीनामे देत बंड केले. त्यामुळे संघावर प्रशासक नियुक्त करण्यात आला होता.

दरम्यानच्या काळात निवडणूक प्रक्रीया सुरु झाली. या निवडणुकीत मुकुंद पोवार विरुद्ध तानाजी पोवार अशी सरळ लढत होती. त्यामुळे या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष वेधले होते. ३०३ सभासदांपैकी ३०१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

सायंकाळी मतमोजणीस सुरवात झाली. पहिल्या टप्प्यात राखवी जागांची मतमोजणी करण्यात आली यात सुरवातीपासूनच विकास आघाडीचे उमेदवार ७० मतांनी आघाडीवर होते. मतदारांचा हा कौल पहाता पारडे विकास आघाडीच्या बाजुने झुकत असल्याचे दिसून आल्याने सत्ताधार्यानी मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला. सात वाजता सर्व निकाल हाती आल्यानंतर विकास आघाडीने सर्वच्या सर्व १९ जागा मोठ्या फरकाने जिंकत एकतर्फी विजय मिळवल्याचे स्पष्ट झाले. निकाल घोषीत झाल्यानंतर विकास आघाडीच्या समर्थकांनी गुलालाची मुक्त उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत एकच जल्लोष केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रीया दळणर तर सहायक म्हणूक उदय उलपे, राजू हावळ यांनी काम पाहिले.

विजयी उमेदवार याप्रमाणे

सुभाष कदम, शाहू काटकर, महादेव कोळी, बाबुराव चौगुले, उदय जोशी, जयहिंद तोडकर, भीमराव नलवडे, कृष्णात पाटील, जयसिंग पाटील, तुकाराम पाटील, महादेव पाटील, यशवंत पाटील, राहूल पाटील,रमेश साळोखे, वसुंधरा पाटील,कीर्ती मोरे,युवराज पाटील,तानाजी पोवार,

पराभूत उमेदवार याप्रमाणे

राहूल आवळे, शिरीष करंबे, नागेश गाडीवडर, लक्ष्मण धोत्रे, भरमा पाटील,अविनाश पोवार,कृष्णात पोवार,प्रणवकुमार पोवार,मुकुंद पोवार,संदीप पोवार,विशाल यादव, भालचंद्र साळोखे, सदाशिव सांगावकर, राजराम हसुरे, शारदा पोवार, शर्मिला शिंगाडे, अरुण निबांळकर, बाजीराव गोधडे, प्रमोद पोवार.

तानाजी पोवार किंगमेकर

सत्ता परिवर्तनात इचलकरंजीचे नगरसेवक तानाजी पोवार यांची पहिल्यापासुन महत्वपूर्ण भूमिका राहिली. सत्ताधारी गटातील नऊ संचालकांना राजीनामे देण्यास भाग पाडून अगदी न्यायालयीन लढाई पर्यंत त्यांनी लढा दिला. या संपूर्ण घडामेडीत तानाजी पोवार किंगमेकरच्या भूमिकेत पहायला मिळाले.

पितापुत्रांचा पराभव

यंदाच्या निवडणुकीत मुकुंद पोवार आणि त्यांचा पुत्र माजी अध्यक्ष प्रमोद पोवार निवडणुकीत उतरले होते. मात्र या निवणुकीत त्या दोघांचाही पराभव झाला. भटक्या विमुक्त प्रवर्गातून प्रमोद पोवार यांचा तानाजी पोवार यांनी ७८ मतानी पराभव केला. या प्रवर्गातील निवडणुकीकडे विशेष लक्ष लागले होते.