कोल्हापूर : शिरोळ पोलीस ठाण्यातील एका उपनिरीक्षकाने दोनदा विवाह केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाची चौकशी होऊन इम्रान बाबाजी मुल्ला यास पोलीस प्रशासनाने निलंबित केले.
मुल्ला याचा २०१९ मध्ये आफरीन मुल्ला यांच्याशी विवाह झाला होता. गोंदिया पोलीस ठाण्यात पतीकडून शारीरिक, मानसिक छळ होत असल्याचा फिर्याद आफरीन यांनी दिल्याने मुल्ला याच्यावर सेवेतून निलंबनाची कारवाई झाली होती. आफरीन यांनी पाठपुरावा केल्यानंतर मुलाचे २०१५ मध्ये पहिले लग्न झाल्याचे माहिती उपलब्ध झाली. कायदेशीर घटस्फोट झाल्याची माहिती न देता मुल्लाने आफरीन यांच्याशी विवाह केल्याची माहिती पुढे आली होती. मुल्ला याने दोन वेळा लग्न केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाल्याने जिल्हा पोलीस प्रशासनाने सेवेतून निलंबित करण्याचा आदेश काढला आहे, असे शिरोळचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी सांगितले.
तिसरेही लग्न
तर गतवर्षी मुल्ला याने तिसरे लग्न केल्याची माहिती मिळाल्यावर आफरीन यांनी कराड पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पुढे माहिती अधिकारातून पाठपुरावा केला. तेव्हा मुल्ला याने तिसरे लग्न झालेले नसून संबंधित महिला मैत्रीण असल्याचा खुलासा केला होता. मुस्लिम कायद्यानुसार तिहेरी तलाकाची कायदेशीर नोटीस पाठवून लग्न केल्याची माहिती चौकशी वेळी मुल्ला याने दिली होती. मुल्ला – आफरीन यांच्यातील तलाक प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
पेट्रोल चोराकडून १४ घरफोड्या उघडकीस
कोल्हापूर : पेट्रोल चोरी केलेल्या चोरट्याकडे अधिक तपास केला असता त्याच्याकडून १४ ठिकाणी घरफोड्या केल्याची उकल झाली. याप्रकरणी सागर भगवान रेणुसे ( ३६, कसबा बावडा) याच्याकडून १७५ ग्रॅम सोन्याचे दागिने, २ किलो ६०० ग्रॅम चांदीच्या दागिन्यांसह २० लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आल्याचे गुरुवारी सांगण्यात आले.
कसबा बावडा परिसरात घरफोड्या प्रकरणी पोलीस रेणुसे याचा शोध घेत होते. अलीकडेच दुचाकी मधून पेट्रोल चोरत असताना त्याला काही नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. पोलिसांनी त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता १४ ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कमळकर यांनी व्यक्त केली.