कोल्हापूर : पाऊसपाण्याचे वरदान लाभलेला जिल्हा अशी ओळख असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात ११ वर्षांत तीन वेळा कोरड्या दुष्काळाचे संकट उद्भवले; तर दोन वेळा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणीदार जिल्ह्यातील अशी दुष्काळग्रस्त अवस्था जिल्ह्याच्या शेत, पीक अन् शेतकऱ्यासाठीही मारक ठरत आहे. महापुराच्या विळख्यातील कोल्हापूर जिल्हा आता दुष्काळाच्या अरिष्टात सापडत चालला आहे.
कोल्हापूर जिल्हा हा जलवैभव म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान सुमारे १,९६३.६० मिलिमीटर आहे. सर्वांत मोठे काळम्मावाडी, शाहूकालीन राधानगरी या दोन मोठ्या धरणांसह तुळशी (धामोड), चित्री, घटप्रभा, जंगमहट्टी, तिलारी प्रकल्प आदी मध्यम, लघु धरणे मोठ्या प्रमाणात आहेत. कोल्हापूर – सांगली जिल्ह्याच्या सीमेवरील चांदोली धरण आणि सातारा जिल्ह्यातील कोयनेतून कृष्णा- वारणा नदीतून होणारा पाण्याचा प्रवाह हा कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ, कागल या तालुक्यांची शेतपिकांची हिरवाई फिरवण्यास उपयुक्त ठरत असतो.
परंतु, पाण्याने समृद्ध असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यावरही दुष्काळ छाया गडद होत चालल्याचे गेल्या दहा-बारा वर्षांतील एकूण परिस्थितीतून दिसून येत आहे. सन २०१५-१६ मध्ये जिल्ह्यात कमी पाऊस पडला होता. पूर्वेकडील हातकणंगले, शिरोळ, तसेच गडहिंग्लज भागात पिकांचे मोठे नुकसान झाले होते. २०१८ मध्ये दुष्काळाची तीव्रता मोठ्या प्रमाणात होती. जिल्ह्यात सहा तालुक्यांतील २०१ गावे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाली होती. दुष्काळाचा फटका बसल्याने जिल्हा प्रशासनाने टँकरद्वारा पाणीपुरवठा आणि चारा छावण्या सुरू केल्या होत्या.
सुदैवाने २०१९ ते २०२२ हा जिल्ह्यासाठी दुष्काळमुक्त काळ राहिला. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत असताना, कोल्हापूर जिल्हा टँकरमुक्त राहिला. पुढे २०२३ मध्ये जिल्ह्यात दुष्काळाने पुन्हा डोके वर काढले. पूर्व भागातील सात तालुक्यांत पाणीसाठा ५० टक्क्यांपेक्षा कमी नोंदवला गेला. ११७ गावे आणि १२८ वाड्या पाणीटंचाईच्या छायेखाली होत्या. दुर्गम वाड्या, गावामध्ये पाण्याचे पारंपरिक स्रोत कोरडे पडल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे लागले. एकट्या राधानगरी तालुक्यातील १५ वाड्या आणि एका गावाला दिलासा देण्यासाठी नवीन विंधन विहीरखोदाई प्रस्तावित करण्यात आली होती. टँकरची संख्या २० पर्यंत गेली होती.
यानंतर आता २०२६ मध्ये जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत केवळ ५१.७ टक्के पाऊस पडला आहे. सहा तालुके दुष्काळी यादीत समाविष्ट करण्यात आले. संपूर्ण जिल्हा दुष्काळी जाहीर करण्याची मागणी जिल्हा मध्यवर्ती बँक, साखर कारखाने यांच्या वार्षिक सभांमध्ये करण्यात आली आहे. जलयुक्त कोल्हापूर जिल्ह्याला साधारण दर चार-पाच वर्षांनी दुष्काळाचा फटका बसत चालला आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागात साधारण सरासरीइतका पाऊस दिसत असला, तरी सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या पश्चिमेकडील घाट भागात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी होत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. जगभरातच वैश्विक तापमानवाढीचे परिणाम दिसू लागले असून, त्याचे परिणाम कोल्हापुरातही जाणवत आहेत. – जालिंदर पांगरे, कृषी अधीक्षक, कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण घटत चालले आहे. परिणामी शेतीचे उत्पन्न कमी होत आहे. त्यामुळे कर्जबाजारीपणाबरोबरच प्रापंचिक खर्च, शैक्षणिक, आरोग्य याच्या खर्चाचा शेतकऱ्यावरील बोजा वाढत चालला आहे. – शिवाजी माने, अध्यक्ष, जय शिवराय शेतकरी संघटना
