scorecardresearch

भाजपाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र राहणं आवश्यक – सतेज पाटील

आयात उमेदवारामुळे कोल्हापूर भाजपात अंतर्गत खदखद असल्याचंही पाटील म्हणाले आहेत.

ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार पी. एन. पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार राजेश पाटील हेही सतेज पाटील यांच्यासोबत व्यासपीठावर उपस्थित होते.

कोल्हापूर उत्तरमधून भाजपाने आयात उमेदवार दिल्याने भाजपात अंतर्गत खदखद आहे. त्यामुळे काँग्रे्सचा विजय निश्चित आहे, असे मत पालकमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्याने कोल्हापूर उत्तर विधानसभेचा पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.


भाजपने माजी नगरसेवक सत्यजित कदम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर महाविकास आघाडीने ही जागा काँग्रेसची असल्याने या पक्षासाठी सोडली आहे. चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांची उमेदवारी निश्चित असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या चार राज्यात भाजपाने सत्ता मिळवली असून त्याची पुनरावृत्ती कोल्हापुरात होईल, असे विधान भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केले होते. त्यावर पालकमंत्री पाटील आज म्हणाले की, कोल्हापूर शहराचा इतिहास हा नेहमीच वेगळा आहे. कोल्हापूरचे वेगळे संस्कार आहेत. देशात काय घडतंय त्यापेक्षा कोल्हापूरकरांना काय हवे हे महत्वाचे आहे. मुळात भाजपने या निवडणुकीत आयात उमेदवार दिल्याने भाजपामध्ये खदखद आहे. त्यामुळे पोट निवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित आहे.


भाजपला रोखण्यासाठी महा विकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र राहणे गरजेचे असल्याचही पाटील यांनी सांगितले. ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार पी. एन. पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार राजेश पाटील उपस्थित होते.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kolhapur election satej patil maha vikas aghadi government bjp vsk

ताज्या बातम्या