कोल्हापूर : कागल तालुक्यात मंत्री हसन मुश्रीफ, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे समरजित घाटगे, भाजपचे माजी आमदार संजय घाटगे यांनी एकत्र येऊन एकनाथ शिंदे शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांना तालुक्याच्या राजकारणात महायुती अंतर्गत एकाकी पाडले. परंतु आता पालकमंत्री आणि शिंदे सेनेचे नेते प्रकाश आबिटकर यांनी कागल तालुक्यात संजय मंडलिक यांना भक्कम पाठबळ द्यायचा निर्णय घेतल्याने मंडलिक यांना बारा हत्तीचे बळ मिळाले आहे.

कागल तालुक्यामध्ये धक्कादायक राजकीय घडामोडींची नोंद होत चालली आहे. एकमेकांचे पक्के वैरी असलेले मंत्री मुश्रीफ व समरजित घाटगे यांनी एकत्रित राजकारण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये माजी आमदार संजय घाटगे यांनाही सामावून घेण्याचा विचार बोलून दाखवला आहे.

तालुक्यातील ही त्रयी एकत्रित आल्याने माजी खासदार संजय मंडलिक यांना एकाकी वाटचाल करावी लागत आहे. मंडलिक यांना एकटे पाडण्याची ही चाल लक्षात घेऊन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कागलच्या मैदानात दंड थोपटले आहेत. त्यांनी गुरुवर्य सदाशिवराव मंडलिक यांचे सुपुत्र असणारे संजय मंडलिक यांना संपूर्ण ताकद द्यायची ठरवली आहे. परिणामी एकाकी झुंज देणाऱ्या संजय मंडलिक यांना भरभक्कम ताकद मिळाली आहे. यामुळे आता कागल मधील संघर्ष अधिकच रंगतदार होणार असे दिसू लागले आहे.

कागल पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शाहू आघाडी एकत्र आल्यामुळे स्थानिक राजकारणात भूकंपजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मुश्रीफ आणि घाटगे यांचा अनेक वर्षांचा राजकीय संघर्ष बाजूला ठेवत दोन्ही गटांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याने  चर्चांना उधाण आले आहे.

कागल व तालुक्याचा सर्वांगीण विकास व राजकीय संघर्षातून मुक्तता तसेच एकत्रित शक्तीने जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. तर पूर्वी झालेल्या तालुक्यातील आघाड्यांचा दाखला दोन्ही बाजूच्या प्रसिद्ध पत्रकात देण्यात आला आहे. राष्ट्रवादी– श्री छत्रपती शाहू आघाडीने नगराध्यक्ष पदासह सर्व उमेदवारांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. 

कागल नगरपरिषद निवडणुकीत आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि छत्रपती शाहू आघाडी यांची अनपेक्षितरीत्या आघाडी जाहीर झाली. ही राजकीय घटना कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी सल्लामसलत न करता घडल्याने त्यांच्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. या संदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्व कार्यकर्त्यांची सार्वजनिक माफी मागितली. मंत्री मुश्रीफ यांनी माजी आमदार संजय घाटगे आणि त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना विश्वास न घेता निर्णय घ्यावा लागल्याची दिलगिरी व्यक्त केली आहे. ही आघाडी त्यांच्या किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या विश्वासाला धक्का देणारी ठरणार नाही. आपल्यातील गैरसमज दूर होतील आणि वरिष्ठ नेतृत्वाकडून या कार्यकर्त्यांना अधिक दिलासा मिळावा यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहीन, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.