कोल्हापूर : राज्य अन्न आयोगाने महावितरणाला शेतकऱ्याच्या शेतातली वीज न कापण्याची सूचना वजा आदेश चार वर्षांपूर्वी दिला असताना आता खरीप हंगामाच्या तोंडावरच महावितरण कडून शेती वीज पंपाच्या कालावधी कमी करण्यात आला आहे. पूर्वी आठ तास होणारा शेती पंपाचा कालावधी आता सहा तासावर आणला आहे. यामुळे शेतीपंपाचा वीजपुरवठा ऐनखरीप हंगामात दोन तासांनी कमी झाला आहे.

शेतीच्या कामासाठी डिझेल मिळण्यामध्ये अडचणी येत असताना दुसरीकडे शेतीपंप कालावधी कमी केल्याने खरिपाची कामे शेतीची इतर कामे कशी करायची? या मुद्द्यावरून कोल्हापूर जिल्ह्यातील जय शिवराय शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी येथील महावितरणच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा मारा केला. या मुद्द्यावरून शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना अनेक प्रश्न उपस्थित केले.

महावितरणचे मुख्य अभियंता यांच्याशी झालेल्या चर्चेवेळी जय शिवराय शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी सांगितले की, २६ मे पासून अचानकपणे शेतीपंपाची वीज २ तास कपात करण्यात आली आहे. सध्या पेरणीचा हंगाम सुरु आहे. तसेच प्रचंड उष्णतेमुळे पिके देखील होरपळून जाऊ लागली आहेत.

अगोदरच शेतमाल उत्पादन खर्च प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत. त्यातच आपल्या विभागामार्फत ८ तास मिळणारी वीज कालपासून २ तास कपात करून केवळ ६ तास वीज सुरु केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्याच्या संयमाचा बांध सुटत चालला आहे. वर्षभर कष्ट करून पिकवलेली पिके पाण्याअभावी डोळ्यादेखत करपलेली पाहून शेतकऱ्यांच्या मनामध्ये वीज वित्तरण कंपनीविरोधात संताप व्यक्त होत आहे. कष्ट करून घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाला अगोदरच दर मिळेना झालेत. अशातच शासनाने वीज तुटवड्याचे कारण सांगून वीज कपात करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे.

सर्व जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांची वीज कपात न करता आपण उद्योगधंद्याची वीज कपात करावी. शेवटी शेतकऱ्याने पिकवलेले धान्य खाऊनच आपल्यासह सर्व नागरिकांची भूक भागत आहे. कारखान्यातील निर्माण होणाऱ्या उत्पादनामुळे आपले पोट भरत नाही याची जाणीव ठेऊन आपण तात्काळ शेतीपंपाची वीज पूर्ववत ८ तास करावी, याउलट उन्हाळ्यामुळे शेतीपंपाची वीज आणखीन २ तास वाढवून मिळावी अशी मागणी आहे. कपात केलेली वीज तात्काळ वाढवून न दिल्यास शेतकऱ्यांना घेऊन आम्ही सोमवार, १ जून पासून तीव्र आंदोलन करणार आहोत, असा इशारा माने यांनी यावेळी दिला. यावेळी शेतकऱ्यांकडून काही बरे वाईट झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील, याबाबत आम्हा कोणालाही जबाबदार धरू नये याचीही नोंद घ्यावी, असेही ते म्हणाले.