कोल्हापूर : जिल्ह्यात पर्जन्यमानामुळे पुरस्थिती निर्माण होते. या संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनान पूर्णपणे सज्ज असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी रविवारी दिली. पंचगंगा नदीवरील पावसाच्या राजाराम बंधारा येथे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास यंत्रणा सज्ज असावी या उद्देशाने जिल्हाधिकाऱ्यांनी साहित्य आणि प्रात्यक्षिकाची आज पाहणी केली.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत राजाराम बंधारा येथे देखभाल, दुरुस्ती, प्रात्यक्षिक व प्रशिक्षण या उद्देशाने तीन दिवशीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रारंभी जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रशिक्षणातील सहभागी आपदा मित्र व आपदा सखींची आस्थापूर्वक चौकशी करून त्यांना आपत्कालीन स्थितीमध्ये येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच रेस्क्यू बोट, लाइफ जॅकेट, लाइफ रिंग, सॉकर कटर , हायड्रोलिक कटर, रेस्क्यू रोप, इमर्जन्सी फ्लोटींग लाईट्स आदींची पाहणी राठोड यांनी यावेळी केली. करवीर तहसीलदार स्वप्निल पवार अग्निशमन दलाचे अधिकारी दस्तगीर मुल्ला, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ उपस्थित होते.

महापूर नियंत्रणाचे उपाय

कोल्हापूर आणि सांगलीला येणारा महापूर कसा नियंंत्रित करता येईल, यासाठी उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यासाठी राजापूरपासून कृष्णेपर्यंतच्या सर्व नद्यांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण व मॉडेलिंग केले जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र प्रतिसाद विकास कार्यक्रमांतर्गत सर्वेक्षण करण्यासाठी दिल्ली येथील खासगी एजन्सीची नेमणूक केली आहे. या एजन्सीने कोल्हापूर जिल्ह्यातील नदीपात्रांचे सर्वेक्षण सुरू केले असून, बेंचमार्क सुरू आहे. तिन्ही जिल्ह्यांतील १८ नद्यांच्या १ हजार ४५५ किलोमीटर अंतरातील नदीपात्राचे तसेच १७ मोठ्या नाल्यांचेही सर्वेक्षण होणार आहे. यासाठी १० जणांचे पथक कार्यरत आहे.

अक्षांश-रेखांशासह पातळी मिळण्यासाठी ‘डीजीपीएस’ उपकरणाद्वारे नदीचे क्रॉस सेक्शन (आडवे छेद) अभ्यासण्यात येणार आहेत. यासाठी इको-साऊंडर, पाण्यातील पातळीसाठी स्वयंचलित बोट तसेच ड्रोनचा वापर करुन महापुराची तीव्रता, व्याप्ती यांचेही मूल्यमापन होणार आहे. याशिवाय पाऊस किती पडला, पाण्याचा विसर्ग किती आणि महापुराचा अंदाज याचा अभ्यास करून उपाययोजनांचा आराखडा सादर केला जाणार आहे.

अलमट्टी इफेक्ट

सुरुवातीला कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची ५०० मीटर होती, त्यावेळीही काहीवेळा अतिवृष्टी झाली होती; पण कधी कोल्हापूर-सांगलीला जीवघेण्या महापुराचा तडाखा बसलेला नव्हता. त्यानंतर अलमट्टीची उंची ५०५ मीटर आणि नंतर ५१२ मीटर करण्यात आली. पण त्यावेळीही कधी महापूर जाणवला नाही; पण २००५ साली अलमट्टी धरणाची उंची ५१८मीटर करण्यात आली आणि नेमक्या त्याच वर्षी कोल्हापूर-सांगलीला जीवघेण्या महापुराचा तडाखा बसला. त्यावेळी पहिल्यांदाच या भागातील लोकांच्या मनात अलमट्टी आणि इथला महापूर याबद्दल शंकेची पाल चुकचुकली; पण त्याची फारशी दखल घेतली गेली नाही. २०१९ आणि २०२१ साली आलेल्या महापुराने अलमट्टी आणि महापूर यांचा परस्परसंबंध अधोरेखित केला आहे.