कोल्हापूर : पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने शिरोळ तालुक्यात महापुराच्या संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि स्थानिक वजीर रेस्क्यू फोर्स यांनी कृष्णा – पंचगंगा संगम परिसरात यांत्रिक बोटींसह संयुक्त बचाव सराव करून सज्जता दाखवून दिली.
एनडीआरएफच्या पथकाने तालुक्यातील पूरग्रस्त व पूरधोक्याच्या गावांना भेटी देत नदीपात्राची पाहणी केली. सुरक्षित स्थलांतराचे मार्ग, बचावासाठी आवश्यक ठिकाणे आणि आपत्कालीन प्रतिसादाची तयारी यांचा आढावा घेण्यात आला. आधुनिक यांत्रिक बोटीद्वारे प्रत्यक्ष बचाव कार्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
या संयुक्त सरावात स्थानिक वजीर रेस्क्यू फोर्सच्या स्वयंसेवकांनीही सक्रिय सहभाग घेतला. स्थानिक भौगोलिक परिस्थितीची अचूक माहिती आणि एनडीआरएफचे तांत्रिक कौशल्य यांचा समन्वय साधून भविष्यातील बचाव कार्य अधिक परिणामकारक करण्यावर भर देण्यात आला.
आठवडाभर झोडपून काढणाऱ्या पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी काहीशी विश्रांती घेतली. नदीच्या पाणी पातळीमध्ये फारशी वाढ झालेली नाही. यामुळे पुराचा धोका टाळताना दिसत आहे. पाण्याखालील बंधाऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे. पावसाने उसंत दिल्याने शेती कामांना गती आली आहे.
जिल्ह्यात पावसाचे प्रमाण आता कमी झाले आहे. काल रात्री जिल्ह्यात मुसळधार पावसाने धुडगूस घातला होता. तीन तासाहून अधिक काळ पावसाचा वर्षाव सुरू होता.
आज पावसाच्या तुरळक सरी पडल्या. गेल्या २४ तासात सरासरी २१.४९ मिमी पावसाची नोंद झाली. राधानगरी तालुक्यात सर्वाधिक ३४ मिमी पाऊसाची नोंद झाली. काल सायंकाळी पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा पाणी पातळी ३६.०८ फूट होती. ती आज याचवेळी कायम राहिली. पाण्याखालील बंधारे संख्या ६१ होती. ती आज ४४ इतकी कमी झाली.
शेतात लगबग वाढली
कोल्हापूर जिल्ह्यात आज सूर्यदर्शन झाले. पावसाने काहीशी उघडीप दिली असताना शेतीच्या कामांना गती आली आहे. शिवारांमध्ये कामाची लगबग दिसून येत आहे. जून महिन्यामध्ये पावसाने दगा दिला. महिन्याच्या अखेरीस पावसाचे दर्शन घडले. गेला आठवडाभर पावसाचा धुमाकूळ सुरू होता. आता पावसाने उसंत दिल्यानंतर रानात शेतीच्या कामाची धांदल उडालेली आहे. भांगलनीची कामे गतीने सुरू झाले आहेत. पेरणी कामाला वेग आला आहे. अजूनही अपेक्षेप्रमाणे पेरणी झालेली नाही. शेतकामासाठी पुरेशा संख्येने मजूर मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. भात, सोयाबीन, भुईमूग पिकातील तण काढण्याचे तसेच खताचा डोस देण्याचे काम शेतात सुरू आहे.
