कोल्हापूर : कोल्हापूरच्या फुटबॉल संस्कृतीविषयी नेहमीच एक कुतूहल निर्माण झालेले असते. फुटबॉलवेड्या कोल्हापुरातील चौका चौकात, तालमी, पेठांमध्ये आवडत्या खेळाडूंचे भव्य फलक लागले आहेत. यातून आपल्या आवडीचा संघ फुटबॉलच्या विजेते पदाला गवसणी घालणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
फिफा चषक स्पर्धा ११ जूनपासून अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये सुरू होत असून फुटबॉलचा हा महाकुंभ २० जुलैपर्यंत चालणार आहे. कोल्हापूर आणि फुटबॉल यांचे एक वेगळेच अतूट नाते आहे. कुस्ती आणि तांबडा-पांढरा रस्सा यासाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूरमध्ये फुटबॉलची क्रेझ इतकी आहे की, या शहराला भारताची दुसरी फुटबॉल पंढरी मानले जाते. फिफा वर्ल्डकपच्या काळात भारतात प्रत्यक्ष सहभाग नसला तरीही कोल्हापुरात फिफाचा ज्वर शिगेला पोहोचलेला असतो. याची प्रचिती सध्या करवीर नगरीत पाहायला मिळत आहे.
येथील अनेक तरुण मंडळांनी ब्राझील, अर्जेंटिना, जर्मनी, पोर्तुगाल किंवा फ्रान्स यांसारख्या संघांना पाठिंबा दिला आहे. पेठा-पेठांमध्ये आपल्या आवडत्या देशाच्या झेंड्यांच्या पताका लावून जल्लोष केला जात आहे.
खेळाडू अवतरले कोल्हापुरात
जागतिक फुटबॉल स्पर्धेवर मुद्रा उमटवणाऱ्या विदेशातील नामवंत खेळाडूंचे कोल्हापूरकर चाहते आहेत. चाहत्यांचे हे प्रेम पोर्तुगाल संघाचा मुख्य आधारस्तंभ गोल मशीन ख्रिस्तीयानो रोनाल्डो, आधुनिक फुटबॉलचा सर्वात मोठा सुपरस्टार, अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी, ब्राझीलचा हा स्टार फॉरवर्ड खेळाडू नेमार, इंग्लंडच्या राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करणारा हॅरी केन, जागतिक फुटबॉलमधील सर्वात घातक फॉरवर्ड मानला जाणारा फ्रान्सचा किलियन एम्बाप्पे आदी दिगंत कीर्तीच्या फुटबॉलपटूंचे मोठमोठे कट आउट उभारून व्यक्त केले आहे. शिवाय चौका चौकात या संघाचे ध्वज लावले आहेत. संघाच्या जर्सी ( गणवेश)! घालून कोल्हापुरातील तरुण फुटबॉल खेळाडू रस्त्यावरून वावरत आहेत.
लाख मोलाच्या पैजा
एकूणच कोल्हापुरातील फिफा वर्ल्ड कप वारे वेगाने वाहत आहे. ज्याच्या त्याच्या तोंडी फुटबॉलची जागतिक स्पर्धा, संभाव्य विजेता, नामवंत खेळाडूंची कामगिरी याविषयी तावातावाने चर्चा होताना दिसत आहे. वेगवेगळ्या पद्धतीच्या पैजा लावल्या जात आहेत.
शहरभर फुटबॉलच्या खुणा
एकूण काय तर, तांबडा पांढरा, झणझणीत मिसळ आणि कुस्ती याप्रमाणे रांगड्या कोल्हापूरकरांचे आणखी एक मर्मस्थळ म्हणजे फुटबॉल. फिफा जागतिक विश्वचषक जागतिक फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने तर कोल्हापूरकरांमध्ये जणू विलक्षण ज्वर संचारला आहे. त्याच्या खाणाखुणा अवघ्या करवीर नगरीत पाहायला मिळत आहेत.कोल्हापूरमध्ये कुस्ती हा आवडता खेळ. क्रिकेटही खेळणाऱ्यांची संख्याही चिक्कार. पण कोल्हापूरची क्रीडा खेळाची खरी आवड आहे ती फुटबॉल. अनेक पेठांचे स्वतःचे फुटबॉल क्लब आहेत. त्यांचे आवडते खेळाडूही ठरलेले आहेत. विश्वचषक सुरू झाला की लाडक्या खेळाडूंचे कट आउट, फ्लेक्स, भिंतीवरची चित्रे, पताका यामुळे वातावरण भारून गेले आहे.
