कोल्हापूर : राज्यातील गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी व अतिक्रमणे रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याचे आदेश सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी जानेवारी महिन्यात दिले होते. ही समिती कोल्हापुरात स्थापन होण्यास अर्धे वर्षे वाया गेले. सहा महिन्याच्या अवधीनंतर ही समिती कोल्हापुरात आता स्थापन करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यात सध्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अंतर्गत एकूण ४७ केंद्र संरक्षित किल्ले आणि पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनलय अंतर्गत ६२ राज्य संरक्षित किल्ले आहेत. केंद्र व राज्य संरक्षित किल्ल्यांचे जतन व संवर्धन करण्याकरीता व हा सांस्कृतिक वारसा सुस्थितीमध्ये ठेवण्याकरीता त्यावर अतिक्रमण होऊ नये यादृष्टीने दक्षता घेणे आवश्यक आहे. केंद्र व राज्य संरक्षित किल्ले आणि सुमारे ३०० असंरक्षित गड किल्ल्यांच्या ठिकाणी अतिक्रमण होत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे. यामुळे केंद्र व राज्य संरक्षित किल्ले आणि असंरक्षित गड किल्ले यांच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था धोक्यात येणे, वास्तुच्या सौंदर्यास बाधा पोहोचू नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनांनुसार जिल्हा स्तरावरील केंद्र व राज्य संरक्षित आणि असंरक्षित गड किल्ल्यांवरील अतिक्रमणे दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येत आहे, असे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी जानेवारी महिन्यात घोषित केले होते. तथापि अशा समिती जिल्ह्यांमध्ये स्थापन होण्यास बराच वेळ लागत आहे. जिल्हा प्रशासनाचा हलगर्जीपणा निदर्शनास येत असल्याचे गडप्रेमींचे म्हणणे आहे.
कोल्हापुरात समिती स्थापन
शासन निर्णयावर कृती करत तब्बल ६ महिन्यानंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने या समितीची स्थापना केली आहे. जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या १४ सदस्यीय या समितीत १० सदस्य प्रशासकीय अधिकारी असून ४ सदस्य हे अशासकीय सदस्य आहेत. निवासी उपजिल्हाधिकार्यांकडे याचे सचिव पद देण्यात आले आहे.
या अभ्यासकांचा समावेश
या ४ सदस्यांमध्ये कोल्हापूर हिल रायहर्स फाऊंडेशनचे प्रमोद पाटील, राम यादव, गडहिंग्लज येथील दुर्गवीर प्रतिष्ठानचे संतोष हासूरकर, कोल्हापूर येथील मोडी लिपिक अभ्यासक अमित अडसूळ यांचा समावेश आहे.
कामास सुरुवात कधी?
वस्तूत: या समितीने ३१ मे पर्यंत कालबद्ध पद्धतीने अतिक्रमणे हटविण्याचे काम करावे आणि वेळोवेळी केलेल्या कामांचा अहवाल शासनास सादर करावा, असे नमूद केले होते. जुलैत ही समिती स्थापन झाली असून या समितीची बैठक होईल. यानंतर अतिक्रमणांवर चर्चा होऊन प्रत्यक्ष कारवाई होणार आहे.
अतिक्रमणे हटवा
या संदर्भात हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट म्हणाले, ‘१४ सदस्यीय समितीत १० सदस्य हे शासकीय अधिकारी आहेत. वस्तुत: गटकोटांसाठी ज्या संघटना प्रत्यक्ष काम करतात अशा सदस्यांची संख्या अधिक असणे अपेक्षित होते. अशासकीय सदस्यांमध्ये जे गडकोटांच्या संदर्भात प्रत्यक्षात अनेक वर्षे जीवाचे पाणी करून काम करतात, अशा सदस्यांची नेमणूक झाली असती, तर ते अधिक संयुक्तिक झाले असते. आता या समितीने तात्काळ बैठका घेऊन गडकोटांच्या संदर्भात अतिक्रमण हटवण्याचे काम करून शिवप्रेमींना दिलासा द्यावा.
कोल्हापूतील नोंद असलेले गड
१ भारतीय पुरातत्व खाते यांच्या अखत्यारितील – पन्हाळगड.
२ राज्य संरक्षित गड किल्ले – विशाळगड, भुदरगड, रांगणा
३ राज्य संरक्षित करण्यासाठी प्राथमिक अधिसूचना प्रसिध्द झालेले गड – पारगड, कलानंदीगड, गगनगड, सामानगड, पावनगड
४ असंरक्षित स्मारके गड मुडागड, गंधर्वगड, महिपालगड
जिल्ह्यातील राज्य संरक्षित स्मारके
स्मारक नाव ठिकाण
१ रामचंद्रपंत अमात्य समाधी पन्हाळा
२ बाजीप्रभु, फुलाजी देशपांडे समाधी विशाळगड
३ लक्ष्मी विलास पॅलेस कसबा बावडा
४महादेव मंदिर आरे ता. करवीर
५ पांडवदरा लेणी बोरीवडे, पन्हाळा
६ भुदरगड किल्ला भुदरगड
७ रांगणा किल्ला चिक्केवाडी, भुदरगड
