कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक लवकर संपल्याचा दावा पोलीस प्रशासन करत असले, तरी वस्तुस्थिती वेगळी आहे. ही मिरवणूक पोलिसांनी अरेरावी करून, उद्धटपणाने बळजोरीने संपवली आहे, असा आरोप शहरातील गणेश उत्सव मंडळाची प्रातिनिधिक संस्था असलेल्या कोल्हापूर सार्वजनिक गणेशोत्सव महासमितीने बुधवारी पत्रकार परिषदेत केला. गणेशोत्सव काळात सजीव देखावे लवकर बंद करायला लावणे, भक्तांवर अकारण लाठीमार यांसह पोलिसांकडून अनेक चुका झाल्या आहेत. या संदर्भात दोषींवर कारवाई होण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार करणार आहोत. लवकरच पालकमंत्र्यांना निवेदन देणार आहोत, अशी माहिती शिवाजीराव जाधव यांनी दिली.

गणेशोत्सव कालावधीत मंडळांवर, तसेच गणेशभक्तांवर पोलिसांकडून झालेल्या अन्यायाच्या संदर्भात ‘कोल्हापूर सार्वजनिक गणेशोत्सव समिती’कडून आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषेदत ते बोलत होते. या प्रसंगी ‘कोल्हापूर सार्वजनिक गणेशोत्सव समिती’चे अध्यक्ष गजानन जाधव म्हणाले, ‘‘ गणेशोत्सव मंडळांनी विसर्जनासाठी गंगावेस ते पंचगंगा नदी हा रस्ता वारंवार निवेदन देऊनही चालू केला नाही. महापालिका प्रशासन, पोलीस प्रशासन यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे, तसेच काही ठराविक अधिकार्‍यांच्या चुकीच्या भूमिकेमुळे गणेश विसर्जन मिरवणूक काळात चेंगराचेंगरी झाली. तसेच भक्तांना नाहक त्रास सहन करावा लागला.’’ राजेंद्र ठोंबरे, प्रसाद वळंजु, सुशील भांदिगरे, कपील चव्हाण, शशिकांत बीडकर, अजित सासणे, रामदास काटकर, सदानंद सुर्वे उपस्थित होते.

समितीचे आक्षेप कोणते?

राजवाडा पोलीस ठाणे प्रशासनाने मंडळाच्या कार्यकर्त्यांवर लाठ्या चालवल्या, तसेच मंडळाच्या कार्यर्त्यांना उद्धट वागणूक दिली. पोलीस प्रशासनाने काही मंडळांच्या वाहनांच्या काचा फोडल्या. या घटनेची चौकशी करण्यात यावी आणि संबंधित पोलीस अधिकार्‍यांना निलंबित करण्यात यावे.पारंपरिक वाद्य घेऊन सहभागी झालेल्या मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाने घाई करून त्यांना पुढे जाण्यासाठी दबाव टाकला. ३९ वर्षांत कोणत्याही मंडळाचा देखावा कधीही बंद करण्यात आला नाही; मात्र यंदाच्या वर्षी ‘मर्दनगड’हा सचिव देखावा बंद करण्यास भाड पाडले. राज्याने गणेशोत्सव हा सार्वजनिक उत्सव घोषित केलेला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने मंडळांना सहकार्य करणे अपेक्षित असतांना प्रशासनाने उत्सवाच्या संदर्भात कठोर भूमिका बजावली. पोलिसांची दडपशाही आणि अरेरावी अशीच चालू राहिली, तर भविष्यात त्याच भाषेत उत्तर दिले जाईल, असा इशारा अशी शिवाजीराव जाधव यांनी दिला.

असून हिंदूंचे सरकार

केंद्रात आणि राज्यात हिंदुत्वनिष्ठ विचारांचे शासन असतांना आमच्या राज्यात हिंदूंचे उत्सव साजरे करण्यास आडकाठी का, आम्हालाच नेहमी त्रास का सहन करावा लागतो, असे असेल तर हिंदूंनी सण कसे साजरे करायचे, असा प्रश्‍न समितीचे सुशील भांदिगरे यांनी उपस्थित केला.