कोल्हापूर : कोल्हापुरात गणेश आगमनाच्या मिरवणुकीत बहुतांशी मंडळांनी पारंपरिक ढोल ताशाच्या तालावर ठेका धरत शिस्तबद्ध पद्धतीने मंगलमूर्तीचे स्वागत केले. मात्र काही मंडळांनी पोलिसांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करीत पुन्हा एकदा डीजेचा मोठ्या आवाजात वापर केल्याचे निदर्शनास आले. याची गंभीर दखल घेत पोलीस उप अधीक्षक प्रिया पाटील यांनी आवाज मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कडक कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा दिला आहे.
ध्वनी प्रदूषण मोजणाऱ्या यंत्राद्वारे आवाजाची पातळी तपासली जात असून नियम मोडणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल केले जातील असे त्यांनी सांगितले. ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांना आणि विशेषतः रुग्ण व ज्येष्ठांना होणारा त्रास टाळण्यासाठी नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
शिवाजी चौक परिसरात असलेली २१ फुटी गणेश मूर्ती सोमवारी रात्री भाविकांसाठी खुली झाली. पहिला हार घालण्याचा मान अंजुम पठाण यांना मिळाला. आमदार चंद्रदीप नरके, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार वळंजू, प्रसाद वळंजू, सुहास भेंडे, डॉ. संतोष बेनाडे आदी उपस्थित होते.
दरम्यान, गणरायाचे आगमन झाल्यानंतर शहरातील मंडपांमध्ये गणेश मूर्ती पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वजण आकर्षक मूर्ती, सजावट पाहण्यासाठी मंडळांना भेटी देत आहेत. तर दुसरीकडे मंडळांनी आता प्रत्यक्ष गणेशोत्सवातील आकर्षक देखावे तयार करण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. कारागिरांच्या मदतीने मंडपात देखाव्यांची उभारणी वेगाने सुरू आहे, पुढील काही दिवसांत सर्व देखावे पूर्ण करून भाविकांसाठी खुले करण्याचे नियोजन आहे. यंदाच्या उत्सवात सामाजिक संदेश देणारे आणि आकर्षक देखावे पाहण्याची उत्सुकता नागरिकांमध्ये वाढली आहे.
