कोल्हापूर : स्वयंपाकासाठी कोल्हापूर जिल्ह्यात लोक आता रस्त्यावर उतरू लागले आहे. संभाजीनगर परिसरात गॅस सिलेंडर ग्राहकांनी रास्ता रोको आंदोलन केले. तर इचलकरंजी मध्ये शहर काँग्रेस समितीच्या वतीने गॅस दरवाढीच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये गॅस नियमित मिळण्यात अडचणी येत आहेत. दिलेली तारीख ओलांडून आठवडा झाला तरी गॅस मिळत नसल्याने ग्राहक हवालदिल झाले आहेत. सकाळपासून लोकांच्या गॅस एजन्सी समोर रांगा लागत आहेत. मुदतीत गॅस मिळत नसल्याने आज संभाजीनगर परिसरात ग्राहकांनी रास्ता रोको आंदोलन केले. गॅस एजन्सी समोर समोरील रस्त्यावर आलेल्या ग्राहकांच्या घोषणाबाजीने तणाव निर्माण झाला होता. यामुळे या मुख्य मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
पोलीस बंदोबस्तात वितरण
परिस्थिती लक्षात घेऊन संबंधित गॅस एजन्सी समोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलिसांच्या उपस्थितीमध्ये गॅस वितरण सुरू झाले. ग्राहकांना क्रमाक्रमाने गॅस मिळू लागल्याने झाल्याने तणाव निवळला.
इचलकरंजीत निदर्शने
महागाईने कंबरडे मोडले असताना केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने एलपीजी गॅसच्या किंमती वाढवून पठाणी लुट चालवली आहे. त्यामुळे घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात झालेली दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी, या मागणीसाठी इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज प्रांत कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना देण्यात आले.
निवेदनात, केंद्र सरकारने नुकतीच घरगुती गॅस सिलेंडर दरात ६० रुपये व व्यावसायिक गॅस सिलेंडर दरात ११४रुपयाची भरमसाठ वाढ केलेली आहे. मुळातच आखाती देशातील युद्धाचे गंभीर परिणाम आपल्या देशास भोगावे लागत असल्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनमानावर प्रतिकूल परिणाम होत आहे. डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली युपीए सरकारने आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किंमती वाढल्या तरी त्याचा बोजा सामान्य जनतेवर पडू दिला नव्हता. अनुदान देऊन जनतेला महागाईचे चटके बसू दिले नाहीत. युपीए सरकारच्या काळात घरगुती सिलेंडर ४०० रुपयांना मिळत होते, आता एका गॅस सिलेंडरसाठी ९०० रुपयांपेक्षा जास्त मोजावे लागत आहेत.
व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीही १९०० रुपयावर गेल्या आहेत. किंमती वाढवल्याने व त्याचे रेशनिंग केल्याने खाद्यपदार्थाचे भावही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. गॅस टंचाई नसल्याचे सरकार सांगत असले तरी वस्तु:स्थिती वेगळी असून सर्वसामान्य जनता तसेच हॉटेल्स, खानावळी, खाद्य पदार्थ बनवणारे व बनवून विकणारे छोटे व्यावसायिकांना सिलेंडर विनाअडथळा सहज उपलब्ध होईल याची व्यवस्था करावी तसेच सिलेंडरची दरवाढ कमी करावी, असे म्हटले आहे.
यावेळी प्रदेश सचिव शशांक बावचकर, शहराध्यक्ष संजय कांबळे, बाबासाहेब कोतवाल, विद्या भोपळे, सावित्री हजारे, शुभांगी मुसळे, लक्ष्मी नलवडे, शुभांगी बोंगार्डे, युवराज शिंगाडे, प्रमोद खुडे, हारुण खलिफा, रविराज पाटील, सचिन साठे, अण्णा कांबळे, रवी वासुदेव, अनिल पचिंद्रे, पोपट शिंदे, राशीद ढालाईत, ताजुद्दीन खतीब, प्रमोद नेजे, अरविंद धरणगुत्तीकर, रमजान शिकलगार, पवन शिंदे, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
