कोल्हापूर : अत्याचाराविरोधात लढायला शिकले पाहिजे. अन्यायाविरोधात तुमचे रक्त खवळत नसेल, तर तुम्ही भारतीय नाही, असे मत मुंबईतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांच्या गाडीसमोर निर्भीडपणे उभ्या राहिलेल्या आंदोलनकर्त्या रिया अहिर यांनी येथे व्यक्त केले. भारताला विकसित राष्ट्र बनवायचे असेल, तर देशाच्या जीडीपीच्या किमान सहा टक्के खर्च शिक्षणावर झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्यावतीने देवल क्लबच्या टेंबे रंगमंदिरात आयोजित ‘जेन-झी संवाद’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी दिल्लीतील जंतर-मंतर तसेच मुंबईतील विद्यार्थी आंदोलनात सहभागी झालेल्या रिया अहिर आणि श्रावणी बुवा, कैवल शिंदे, विक्रांत कांबळे, दिलदार मुजावर यांचा ज्येष्ठ पुरोगामी नेत्या सरोज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी सरोज पाटील म्हणाल्या की, जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेला अत्याचार पाहून दुःख झाले. मात्र या तरुण आंदोलनकर्त्यांनी अन्यायाविरुद्ध लढण्याचे नवे बळ दिले. सामाजिक चळवळीमध्ये यापुढेही सक्रियपणे सहभागी होत अन्यायाविरोधात संघर्ष करत राहण्याचे आवाहन त्यांनी केले.रिया अहिर यांनी मुंबईतील आंदोलनातील अनुभव सांगताना, या आंदोलनासाठी मी स्वतःला शिक्षित करून आले होते, असे सांगितले. आंदोलनादरम्यानचा एक फोटो इतिहासाच्या पानावर नोंदला गेला आणि त्यामुळे अनेकांना लढण्याचे बळ मिळाले, याचा मनस्वी आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.भारताला विकसित राष्ट्र बनवायचे असेल, तर शिक्षणावर जीडीपीच्या सहा टक्के खर्च करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्याचे सरकार विद्यार्थीविरोधी असून, त्याच्या शैक्षणिक धोरणावरही त्यांनी जोरदार टीका केली.

रिया अहिर पुढे म्हणाल्या,शाळा बंद करण्याऐवजी मुलांना शाळेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकार मुली, महिला आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत असंवेदनशील आहे. अन्याय-अत्याचार होत असताना तुमचे रक्त खवळत नसेल, तर आम्ही नाही, तुम्ही देशद्रोही आहात, अशा शब्दांत त्यांनी आंदोलनकर्त्यांना विरोध करणाऱ्या सरकारवर आणि विरोधकांवर टीका केली.रिया अहिर यांनी आपण कलाकार आणि मॉडेल असल्याचे सांगत, आंदोलनकर्ती रिया आणि कलाकार रिया या दोन वेगळ्या भूमिका आहेत. काम असो किंवा विचारांची भूमिका असो, ती प्रामाणिकपणे निभावली पाहिजे. या दोन्ही गोष्टी एकत्र करू नका, असे आवाहन केले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना गिरीश फोंडे म्हणाले की, शिक्षण सुधारणा ही केवळ अभ्यासक्रमातील बदलांची संकल्पना नसून ती अत्यंत व्यापक आहे. देशात शिक्षणाचे खाजगीकरण वेगाने वाढत असून ते थांबवून सर्वांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून दिले पाहिजे.सध्याची शिक्षण व्यवस्था मनुवादी आणि मनीवादी बनत चालली आहे. शिक्षणाच्या हक्काची चळवळ व्यापक करण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांचे शैक्षणिक धोरण देशभर लागू करण्याची गरज आहे. शिक्षणावरील अर्थसंकल्पीय खर्च वाढवला पाहिजे. शिक्षणाच्या हक्कासाठीच्या या व्यापक लढ्याची सुरुवात कोल्हापुरातून करूया,” असे आवाहन त्यांनी केले.

संघटनेचे राज्य अध्यक्ष वैभव चोपकर यांनी सरकारच्या शैक्षणिक धोरणावर टीका केली. या सरकारच्या काळात शैक्षणिक व्यवस्था मोठ्या प्रमाणात ढासळली असून सरकारी शाळा बंद करण्याचे धोरण राबवले जात आहे. देशातील ९४ हजार सरकारी शाळा बंद पडल्या असून त्यामध्ये महाराष्ट्रातील सुमारे अडीच हजार शाळांचा समावेश असल्याचा दावा त्यांनी केला.

शिक्षणाचे खाजगीकरण करून संपूर्ण शिक्षण व्यवस्था उद्योगपतींच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. पेपरफुटीसारखी प्रकरणे रोखायची असतील, तर शैक्षणिक संस्थांमधील ठेकेदारी पद्धत बंद करून खासगी कोचिंग सेंटरवर प्रभावी नियंत्रण आणले पाहिजे. राजर्षी शाहू महाराजांचे शैक्षणिक धोरण सरकारने स्वीकारावे, अशी मागणीही त्यांनी केली.

संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विराज देवांग म्हणाले, सरकार उद्योगपतींच्या कर्जमाफीसाठी तत्पर आहे. मात्र कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे पाहण्यासाठी सरकारकडे वेळ नाही, अशी टीका त्यांनी केली.जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाने देशाचा आत्मा जागा केला असून देशाची लोकशाही अधिक बळकट केली आहे,मुख्याध्यापक संघाचे सचिव आर. वाय. पाटील, माजी राज्य सचिव प्रशांत आंबी, नीलम जगताप, हरीश कांबळे, धीरज कठारे, सहर्ष सोनुले, सुनील कोळी, सुशांत कुंभार, कैवल्य शिंदे, दिलदार मुजावर, इंद्रजीत इंदुरकर, सिद्धनाथ गाडे, विवेक मात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी उपस्थित होते.