कोल्हापूर : गोकुळ, जिल्हा बँक, बाजार समिती, शेतकरी संघ या सहकारी संस्थांसह कोल्हापूर महापालिकेवर दोन दशकांहून अधिक काळ निर्विवाद वर्चस्व गाजवणारे माजी आमदार महादेवराव महाडिक, दिवंगत आमदार पी. एन. पाटील आणि गोकुळमधील प्रभावशाली अध्यक्ष अशी ओळख असलेले अरुण नरके यांची राजकीय कारकिर्द चांगलीच गाजली. या तिघांच्या आद्याक्षरावरून कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातील ‘मनपा’ पॅटर्न सर्वोतोमुखी झाला होता. गेल्या गोकुळ निवडणुकीत महाडिक आणि नरके यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. परंतु या निवडणुकीत हे ज्येष्ठ नेते पुन्हा एकदा एकत्रित आल्याने ‘मन’ पुन्हा जुळले गेले असल्याने त्याचा लाभ महायुतीला होण्याची चिन्हे आहेत.
तर अरुण नरके व त्यांचे सुपुत्र गोकुळचे मावळते संचालक डॉ. चेतन नरके यांनी साथ सोडल्याने हा कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांना धक्का ठरला आहे. या निमित्ताने आज एक जुनीच राजकीय वाटचाल नव्या पावलांनी जात असल्याचे दिसून आले.कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व असताना त्यांना पी. एन. पाटील, अरुण नरके यांची मोलाची साथ मिळाली होती. याद्वारेच कोल्हापुरात नव्हे तर जिल्ह्यातच मनपा पॅटर्न दीर्घकाळ आपला प्रभाव टिकवून राहिला. या तिघांतील अतूट मैत्रीचे किस्से चर्चेत आहेत.
गेल्या गोकुळच्या निवडणुकीपूर्वी महादेवराव महाडिक यांना सतेज पाटील, हसन मुश्रीफ, विनय कोरे, चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर यांनी आव्हान दिले. महाडिक विरोधातील या प्रवाहात अरुण नरके सहभागी झाले. त्यामुळे महाडिक – नरके यांच्यात दुरावा निर्माण झाला होता.
जल्लोषात स्वागत
दरम्यान, चेतन नरके यांना गेल्या लोकसभेवर काँग्रेसची उमेदवारी मिळणार अशी अटकळ बांधली गेली होती. परंतु सतेज पाटील यांनी श्रीमंत शाहू छत्रपती यांचे नाव पुढे केले. नरके यांची संधी हुकली. तेव्हापासून नरके गटाचा भ्रमनिरास झाला होता. गोकुळच्या या वेळच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीकडून बेरजेचे राजकारण सुरू झाले आहे. यातूनच महादेवराव महाडिक यांनी आपले जुने सहकारी अरुण नरके यांना हाक घातली. दोघांचेही एकत्र येण्याचे ठरले. आज महायुतीचा मेळावा होत असताना अरुण नरके यांना सोबत घेऊन महादेवराव महाडिक हे स्वतः मोटार चालवत मेळाव्यास्थळी आले. तेव्हा उपस्थितांनी एकच जल्लोष केला. महाडिक – नरके यांना पाच वर्षांनंतर एकत्र पाहून टाळ्यांच्या कडकडाटाने स्वागत करण्यात आले. या निमित्ताने ‘मनपा’च्या राजकारणाचे ‘मन’ पुन्हा जुळले आहे.
लोकसभेची पायाभरणी
काँग्रेसच्या प्रवाहात राजकारण करणारे अरुण नरके आणि चेतन नरके यांनी पक्षाची साथ सोडली असून त्यांचा भाजप राजकारणाचा अध्याय सुरू झाला आहे. चेतन नरके यांचे आगामी लोकसभेसाठी उमेदवार म्हणून नाव चर्चेत येऊ लागले आहे.
