कोल्हापूर : येथील रंकाळवेश गोल सर्कल मित्र मंडळाच्या कोल्हापूरचा राजा गणपतीचे शहरात दिमाखात, जल्लोषात स्वागत करण्यात आले. करवीर नाद ढोलपथकाचा गजर, गुलालाची उधळण आणि ४० हून अधिक ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे पुष्पवृष्टी करत गणरायाचे स्वागत झाले. गुलालाची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने अवघा परिसर दुमदुमून गेला.
दुपार पासून तरुण मंडळींपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच जण कोल्हापूरचे प्रवेशद्वार असलेल्या तावडे हॉटेल परिसरात स्वागतासाठी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. काही अतिउत्साही तरुणांना येथे असणाऱ्या केएमटी बसच्या थांब्याच्या छतावर उभारले असता काठीचा प्रसाद देत खाली उतरवले. शहरासह गांधीनगर, पुलाची शिरोली येथील पोलिस कर्मचारी, गृह रक्षक दलाचे पथक तैनात होते.
मंत्र्यांची उपस्थिती
या स्वागताच्या सोहळ्यात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विशेष चरणी लीन होत दर्शन घेतले आणि उपस्थितांना उत्सवाचा आनंद द्विगुणित करतानाच सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन करत मार्गदर्शन केले. मंत्री महोदयांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांचा उत्साह अधिकच शिगेला पोहोचला होता.
वाहतूक कोंडीने मनस्ताप
या भव्य आणि उत्साही स्वागतादरम्यान, शहरातून जाणाऱ्या पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. आगमनाची मिरवणूक आणि त्यात सहभागी झालेली अलोट गर्दी यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तासनतास वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना आणि वाहनधारकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले.
मोबाईल हातोहात लंपास
उत्सवाचा आनंद द्विगुणित होत असतानाच दुसरीकडे या अफाट गर्दीचा गैरफायदा काही समाजकंटकांनी घेतल्याचे समोर आले. मिरवणुकीच्या ढकलबाजीत आणि गर्दीच्या रेट्यात अनेक भाविकांचे महागडे मोबाईल फोन मोठ्या प्रमाणात चोरीला गेल्याच्या घटना घडल्या. एकाच वेळी शेकडो जणांचे मोबाईल गायब झाल्याने पोलीस यंत्रणेचीही एकच धावपळ उडाली.
कठोर उपाययोजनांची गरज
या गर्दीच्या आणि एकीकडे गणरायाच्या आगमनाचा आनंद आणि मंत्र्यांचे मार्गदर्शन असले, तरी दुसरीकडे महामार्गावरील कोंडी आणि मोबाईल चोऱ्यांच्या वाढत्या घटनांमुळे उत्सवाला काहीशी गालबोट लागल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती. प्रशासनाने अशा गर्दीच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि वाहतुकीच्या नियोजनासाठी किमान पुढील वर्षापासून तरी अधिक कठोर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
