कोल्हापूर : शेतीचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बांधावर गेले पाहिजे. त्यांचे प्रश्न समजून घेऊन सोडवले पाहिजेत. कार्यालयात बसून कागदी घोडे नाचवणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रशासनाला दिला.पालकमंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभागाची आढावा बैठक झाली. सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, खासदार धैर्यशील माने तसेच सतेज पाटील, जयंत आसगावकर, राजेंद्र पाटील–यड्रावकर, चंद्रदीप नरके, अमल महाडिक, अशोक माने, शिवाजी पाटील आदी आमदार, अधिकारी उपस्थित होते.
कृषी विभागाच्या माहितिपुस्तिकेचे प्रकाशन तसेच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी, शेतीविषयक माहिती देणाऱ्या क्यूआर कोड प्रणालीचे अनावरण, कृषी योजनेअंतर्गत ड्रोनचे वाटप दोन लाभार्थींना आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार यड्रावकर यांनी क्षारपड जमिनीबाबत जलसंधारण विभागाने अधिक क्षमतेने काम करून शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्याची सूचना केली.
खत, बियाणे मुबलक
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी कार्यवाही अहवाल सादर केला. जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा नियोजनाचे सादरीकरण करताना यावर्षी बियाणे, खतपुरवठा मुबलक असून जिल्ह्यात तुटवडा नसल्याचे नमूद केले.