कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी पावसाची उघडझाप सुरू राहिली. नदीच्या पाण्यामध्ये वाढ होत असल्याने आणखी दोन बंधारे पाण्याखाली गेले आहेत. एकूण ५९ बंधारे पाण्याखाली केले आहेत. पालेश्वर, धामणी बंधाऱ्याच्या काठावरील लोकांना शकरतेचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापुरात पडलेली झाडे काढण्याची नवीन राबवली जात आहे. वाहतूक मार्ग विस्कळीत झाल्याने जिल्ह्यात एसटीच्या ६०० फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा आज मध्यम स्वरूपात पाऊस पडत राहिला. पालेश्वर तलाव (ता. शाहूवाडी) हा पूर्ण क्षमतेने भरला आहे. शाळी व कडवी नदीपात्रातील पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, धामणी मध्यम प्रकल्प (ता. राधानगरी) हा पूर्ण क्षमतेने भरला असून वळण कालव्यामधून पुच्छ कालव्या द्वारे धामणी नदीमध्ये विसर्ग सुरु झाला आहे. सेवाद्वारा मधून १८३ क्यूसेक्स विसर्ग सुरु झाल्याने धामणी नदीपात्रातील पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा व सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोकण वाहतूक विस्कळीत
कोल्हापूर-गगनबावडा राष्ट्रीय मार्गावर परखंदळे-मेंगाणेवाडी (ता. पन्हाळा) येथे रस्त्याकडचे मोठे झाड सकाळी पावणेअकराच्या सुमारास कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. रस्त्यावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. या मार्गावर दोन्ही बाजूंना ‘रेन ट्री’ची झाडे आहेत. परिणामी तळकोकणात जाणाऱ्या-येणाऱ्या एसटी बससह इतर वाहने अडकून पडली. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासनाने धाव घेऊन झाड हटवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
कोल्हापुरात झाडे हटवली
गेल्या पाच दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध भागांतील २९ झाडे उन्मळून पडली. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने कारवाई करून बहुतांश ठिकाणी रस्ते वाहतुकीसाठी खुले केले आहेत. आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या निर्देशानुसार ही मोहीम रात्रंदिवस सुरू आहे.राजारामपुरी, नागाळा पार्क, ताराबाई पार्क, शिवाजी पार्क, संभाजीनगर, निर्माण चौक, निर्मिती कॉर्नर आणि सानेगुरुजी वसाहत परिसरात पडलेल्या झाडांची छाटणी करून हटवण्यात आली.
एसटीचे गणित बिघडले
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १७ मार्ग बंद झाले आहेत.मुंबईकडे जाणाऱ्या जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. याचा परिणाम एसटीवर झाला आहे. कोल्हापूर विभागातील एसटीच्या ६०० फेऱ्या रद्द झाल्या आहेत. सुमारे २० हजार किलोमीटरचा प्रवास रद्द करावा लागला आहे. यामुळे २० लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे नियंत्रण कोल्हापूर विभागाचे नियंत्रण वृषाली भोसले यांनी सांगितले.
नृसिंहवाडीत दक्षिणद्वार सोहळा
कृष्णा पंचगंगेच्या पुराच्या पाण्याची पातळी वाढल्याने दत्त मंदिरात मंगळवारी या मोसमातील पहिला दक्षिण द्वार सोहळा संपन्न झाला.
पहाटे साडेतीनच्या सुमारास कृष्णाच्या पुराचे पाणी दत्त मंदिराच्या उत्तर द्वारातून श्री च्या मुख्य चरण कमलावरून स्पर्श करून दक्षिण द्वारातून बाहेर पडले. दक्षिण द्वारातून बाहेर पडलेल्या तीर्थामध्ये स्नान करणे पवित्र मानले जाते. यालाच दक्षिण द्वार सोहळा ‘असे संबोधले जाते. पहाटे साडेतीन पासून दिवसभर हा सोहळा सुरू होता. याचा शेकडो दत्तभक्तांनी पवित्र स्नान करून लाभ घेतला.
