scorecardresearch

झोपेतच मृत्यूने गाठले! कोल्हापूरमध्ये भिंत कोसळून महिलेचा मृत्यू

मृत अनिता या हातकणंगले लक्ष्मी औद्योगिक वसाहतीतील समर्थ फौंड्री येथे कामाला होत्या. तर पती रवींद्र हे रिक्षा चालक आहेत.

1. कोसळलेली भिंत. 2. मृत अनिता काटकर

हेर्ले (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथे भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू तर तिघे जण जखमी झाले आहेत. ही घटना आज (सोमवार) पहाटेच्या सुमारास घडली. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अनिता रवींद्र काटकर असे मृत महिलेचे नाव असून काटकर कुटुंबीय घरात झोपले असताना मुसळधार पावसामुळे भिंत कोसळली.

हेर्ले येथील सिद्धेश्वर नगर परिसरात काटकर कुटुंबीय राहतात. रविवारी रात्री काटकर कुटुंबीय घरात झोपले होते. पावसामुळे घराच्या भिंतीला ओल पकडली होती. त्यातच पहाटेच्या सुमारास ही भिंत कोसळली. यावेळी काटकर कुटुंबीय झोपलेले होते. अनिता काटकर (वय ३२), पती रवींद्र काटकर (वय ३८), मुलगा चेतन काटकर आणि मुलगी शिवानी काटकर यांच्या अंगावर ही भिंत कोसळली. त्यावेळी रवींद्र काटकर यांनी घाबरून आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून शेजारी राहणाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन काटकर कुटुंबीयांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. यात रवींद्र काटकर आणि त्यांची दोन्ही मुले जखमी झाले. तर अनिता काटकर यांचा मृत्यू झाला. उपचारासाठी त्यांना कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, मृत अनिता या हातकणंगले लक्ष्मी औद्योगिक वसाहतीतील समर्थ फौंड्री येथे कामाला होत्या. तर पती रवींद्र हे रिक्षा चालक आहेत. काटकर यांनी सुमारे ८ ते १० वर्षांपूर्वीच हे घर बांधले होते.कोल्हापूर जिल्ह्याला काही दिवसापासून मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले आहे. दुर्दैवाने पावसामुळे आज पहाटे याची भिंत कोसळली. अनिता यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kolhapur herle house wall collapsed woman dies 3 injured

ताज्या बातम्या