कोल्हापूर : पुरोगामी राज्य म्हणून ओळख असलेला महाराष्ट्रातील लोकराजा शाहू महाराजांच्या भूमीत एका निवृत्त शल्य चिकित्सकाने गर्भात कळ्या खुरडण्याचे माणुसकीला काळीमा फासणारे घृणास्पद कार्य केले आहे. या प्रकरणांमध्ये जितके दोषी सापडतील त्या कोणालाही सोडले जाणार नाही, असा खरमरीत इशारा आरोग्य तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी येथे दिला.

येथील कदमवाडी भागात एका रुग्णालयात निवृत्त शल्य चिकित्सकास अवैध गर्भपात करताना पोलिसांनी पकडले होते. डॉ. चंद्रकांत गायकवाड यांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. याची दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली होती. यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार सर्वश्री अमल महाडीक, चंद्रदीप नरके,अशोकराव माने जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, मनपा आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन,पोलीस अधीक्षक निलोत्पल, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, करवीर प्रांत अधिकारी मोसमी चौगुले, पीसीपीएनडीटीच्या ॲड. गौरी पाटील उपस्थित होते.

मातेच्या गर्भातच कळ्या खुडण्याचे लांछनास्पद काम जिल्ह्यात काही ठिकाणी गुप्तपणाने सुरू आहे. अशी सर्व ठिकाणे पोलिसांनी उध्वस्त करावीत. त्याचबरोबर यातील दोषींना कडक शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत. जेणेकरून असे कार्य करणाऱ्या दुसऱ्या कोणाची हिंमत होणार नाही, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

कोल्हापूर शहरात घडलेल्या प्रकरणाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील फार्मासिस्टची प्रशासनाने एक बैठक घ्यावी अशी सूचना आमदार अमल महाडिक यांनी केली. तर संशयास्पद ठिकाणची पीसीपीएनडीटी पथकाने यादी द्यावी. या संशयास्पद ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडून अचानक भेट देऊन कारवाई करण्यात येईल असे, जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी यावेळी स्पष्ट केले.

ॲड. पाटील यांनी जिल्ह्यातील सद्यस्थितीतील एकूण नोंदणीकृत सोनोग्राफी केंद्राची माहिती सांगून या समितीच्यावतीने करण्यात येणाऱ्या कारवाईसाठी पोलीस विभागाचे सहकार्य असल्याचे सांगितले. यावेळी पोलीस विभागाचे इतर अधिकारी तसेच पीसीपीएनडीटी समितीतील इतर सदस्य उपस्थित होते.

काय घडले होते?

निवृत्त शल्य चिकित्सकाने गर्भपाताचे रॅकेट चालवण्याचा प्रकार गुरुवारी करवीर पोलिसांनी उघडकीस आणला होता. याप्रकरणी कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात शल्य चिकित्सक म्हणून काम केलेले डॉ. चंद्रकांत गुंडा गायकवाड यांना या पथकाने पकडले होते. त्यांच्याकडून २५० हून अधिक गर्भपात झाल्याचे  पोलिसांचे म्हणणे आहे. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या जिल्हातच एका निवृत्त शल्य चिकित्सकाकडून गर्भपाताचे इतके मोठे रॅकेट जात असल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी बेकायदा गर्भपात करण्याचे पोर्टेबल सोनोग्राफी यंत्र, गर्भपाताची औषधे, वैद्यकीय उपकरणे जप्त केली. पोलिस चौकशी वेळी संशयित आरोपी डॉ. चंद्रकांत गायकवाड यांनी २०० ते २५० गर्भपात केल्याचे मान्य केले होते. तसेच डॉ. गायकवाड यांनी कोल्हापूर, मुंबई, पोलादपूर, सिंधुदुर्ग,रायगड, रत्नागिरी, बीड येथे शल्य चिकित्सक, सेंट जॉर्ज रुग्णालय येथे अतिरिक अधीक्षक, पुणे येथे सहाय्यक संचालक म्हणून काम केले आहे. गायकवाड यांना अटक करत असताना प्रकृती बिघडल्याने ते अंतर रुग्ण म्हणून छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात दाखल झाले होते.