कोल्हापूर : कोल्हापूरच्या तांत्रिक आणि औद्योगिक विकासाला मोठी गती देणाऱ्या प्रस्तावित आय.टी. पार्क (माहिती तंत्रज्ञान पार्क) उभारणीच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा पार पडला. कोल्हापूर शहरातील शेंडा पार्क येथील ३४.३६ हेक्टर आर शासकीय जमिनीचा प्रत्यक्ष ताबा महसूल विभागाच्या वतीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) अधिकाऱ्यांकडे अधिकृतपणे सुपूर्त करण्यात आला. जमिनीची प्रत्यक्ष मोजणी आणि सीमांकन पूर्ण करून हा ताबा देण्यात आल्याने आता या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
असा घडला प्रवास
या आय.टी. पार्कच्या विकासासाठी शेंडा पार्क (कसबा करवीर) येथील गट नंबर ५८३ मधील ७.०५ हे.आर., गट नंबर ५८७ मधील १.१२ हे.आर. आणि गट नंबर ५८८ मधील २६.१९ हे.आर. अशी ३४.३६ हे.आर. जमीन एमआयडीसीला वाटप करण्यास महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने १३ मार्च रोजीच्या ज्ञापनान्वये मान्यता दिली होती. या जमिनीची कृषक दराने प्रचलित बाजारमूल्यानुसार परिगणित केलेली ५ कोटी ६० लाख २३ हजार ९८० रुपये इतकी रक्कम एमआयडीसीने ३० मार्च रोजी शासकीय कोषागारात चलनाद्वारे जमा केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी २ एप्रिल रोजी जमीन हस्तांतरणाचे आदेश निर्गमित केले होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आज या क्षेत्राची प्रत्यक्ष मोजणी व सीमांकन पूर्ण करण्यात आले. त्यानंतर महसूल विभागाच्या वतीने कोल्हापूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे व करवीरचे तहसीलदार स्वप्निल पवार यांनी या जमिनीचा प्रत्यक्ष ताबा एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख व एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता इराप्पा नाईक यांच्याकडे सुपूर्त केला. या प्रसंगी एमआयडीसी कोल्हापूरचे उप अभियंता अजयकुमार रानगे, करवीरचे उप अधीक्षक भूमी अभिलेख किरण माने, प्रमुख भूमापक सुशेन कापरे, प्रमुख भूमापक उमेश कोष्टी, करवीरचे मंडळ अधिकारी गणेश बर्गे, करवीरचे ग्राम महसूल अधिकारी आणि करवीरचे भूकरमापक सूर्याकांत भांदिगरे आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
शेंडा पार्क परिसरातील ही जमीन आता एमआयडीसीच्या ताब्यात आल्यामुळे कोल्हापुरात अत्याधुनिक आय.टी. पार्क उभारणीच्या कामाला वेग येणार असून, यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.
आयटी पार्क मध्ये आनंद
वेगाने आणि सकारात्मकतेने ही प्रक्रिया पूर्ण केल्याबद्दल आम्ही राज्य शासन, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आभार मानतो. दिलेल्या शब्दाप्रमाणे कोल्हापुरात लवकरच राज्याचे ‘नवे आयटी इंजिन’ बनवून दाखवू, अशी प्रतिक्रिया आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष प्रताप पाटील, सचिव राहुल मेंच, आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूर’चे संस्थापक अध्यक्ष
शांताराम सुर्वे यांनी व्यक्त केली.
मार्चमध्ये मंत्रिमंडळाची मान्यता
कोल्हापूर शहरातील शेंडा पार्क परिसरात आयटी पार्क विकसित करण्यासाठी ३४ हेक्टर ३६ गुंठे जमीन देण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या निर्णयासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार अमल महाडिक, राजेश क्षीरसागर यांनी विशेष प्रयत्न केले होते
