कोल्हापूर : दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबाच्या (वाडी-रत्नागिरी, कोल्हापूर) डोंगरावर चैत्र यात्रेनंतरची दुसरी सर्वात मोठी श्रावण षष्ठी मंगळवारी भाविकांच्या अलोट गर्दीत पार पडली.यात्रेनिमित्त महाराष्ट्र व कर्नाटकसह विविध राज्यांमधून दोन लाखावर भाविक जोतिबा गडावर दाखल झाले होते.
वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिबा यात्रेला यंदा भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात्रेनिमित्त गाभारा दर्शन तसेच गाभाऱ्याबाहेरील व मंदिर परिसरातील दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या मोठी होती.

श्रावण शुद्ध षष्ठीला आदिमाया चोपडाई देवीने रत्‍नासुर राक्षसाचा वध केला. राक्षसाच्या रक्ताने देवीच्या अंगाचा दाह झाला. तो शांत करण्यासाठी केदारनाथांसह सर्व देवांनी लिंबू, दुर्वा, बेल व वाळ्याने देवीची पूजा केली. याच आख्यायिकेनुसार रात्रभर जागरण करून देवीची लिंबू, बेल व फुलांची विशेष पूजा बांधली जाते आणि रात्रीभर धुपारती सोहळा चालतो. ही यात्रा प्रामुख्याने रात्रभर भरते. भाविक उपवास धरून जोतिबा डोंगरावर येतात.

यात्राकाळात गाभारा दर्शन घेतलेल्या भाविकांची संख्या ३७ हजार १२७ इतकी असून, शिखर व मंदिर परिसरातून दर्शन घेतलेल्या भाविकांची अंदाजित संख्या ७४ हजार ९२० आहे. यानुसार नोंद झालेली अंदाजित संख्या १ लाख १२ हजार ४७ इतकी आहे. याशिवाय गाभाऱ्याबाहेरील दर्शन तसेच मंदिर परिसरात उपस्थित असलेल्या भाविकांची संख्या विचारात घेतल्यास यात्रेतील एकूण भाविकांची उपस्थिती सुमारे २ लाखांपर्यंत पोहोचल्याचा अंदाज आहे. भाविकांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर दर्शन व्यवस्था, गर्दी नियंत्रण, सुरक्षा, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, अन्न सुरक्षा तसेच भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन आणि देवस्थान समितीच्यावतीने व्यापक नियोजन करण्यात आले होते.

विदेशातील निळे फुल

यात्रेतील विशेष आकर्षण ठरले ते पन्हाळ्याचे आमदार विनय कोरे यांनी विदेशातून आणलेले निळे फूल. या निळ्या फुलाने भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले असून यात्रेच्या धार्मिक व सांस्कृतिक वातावरणात त्याची विशेष भर पडली.

नेटके नियोजन

यात्रेच्या व्यवस्थापनामध्ये प्रांत अधिकारी समीर शिंगटे, पोलिस उपअधीक्षक प्रणील गिल्डा, तहसीलदार पन्हाळा माधवी जाधव शिंदे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, तसेच अन्न सुरक्षा अधिकारी व्ही. ज. पाचपुते यांच्यासह विविध शासकीय विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यात्रेच्या संपूर्ण व्यवस्थेचे उत्कृष्ट नियोजन जिल्हाधिकारी तथा प्रशासक डॉ. विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. देवस्थान समितीच्या सचिव वर्षा साळुंखे यांनी प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि संबंधित विभागांमध्ये आवश्यक समन्वय साधत यात्रेच्या व्यवस्थेवर लक्ष ठेवले. ऑफिस इनचार्ज धैर्यशील तिवले यांनी यात्रेच्या प्रत्यक्ष व्यवस्थापनामध्ये विविध यंत्रणांशी समन्वय साधत महत्त्वाची भूमिका बजावली. मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असूनही प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि देवस्थान समितीच्या संयुक्त नियोजनामुळे यात्रा शांततेत, शिस्तबद्ध आणि सुरळीतपणे पार पडली.