कोल्हापूर : कोल्हापूर नजीकच्या कळंबा येथील महाराष्ट्र नगर परिसरात मंगळवारी सायंकाळी झालेल्या भीषण स्फोटाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या २४ तासांत उलगडा केला. घर उद्ध्वस्त करण्यासाठी जिलेटीन कांड्याचा वापर करून स्फोट घडवून आणल्याप्रकरणी प्रज्योत दीपक पवार (२४, रा. बापूरामनगर, कळंबा), अभिजित प्रभाकर चौगले (२४) आणि प्रसाद दीपक चौगले (२३, दोघे रा. परिते, ता. करवीर) या तीन तरुणांना पोलिसांनी अटक केली. पुढील तपासासाठी त्यांना करवीर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मंगळवारी (४ ऑगस्ट) सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास रणवरे कॉलनी, महाराष्ट्र नगर येथील प्लॉट क्रमांक ६७ वरील घरामध्ये अचानक झालेल्या प्रचंड स्फोटामुळे घराच्या भिंती कोसळल्या. शेजारील घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
घटनेची माहिती मिळताच करवीर पोलिसांसह बॉम्ब शोधक व नाशक पथक, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असता जिलेटीन कांड्याचे अवशेष आढळल्याने हा स्फोट घातपाताचा असल्याचा संशय बळावला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत गुन्ह्याचा तातडीने छडा लावण्याचे आदेश दिल्यानंतर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक सागर वाघ आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक तसेच गोपनीय माहितीच्या आधारे परिते परिसरात सापळा रचून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपींनी सखोल चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. प्राथमिक तपासानुसार मुख्य आरोपी प्रज्योत पवार व मनीष पेठे यांच्यात प्लॉट क्र.६० वरील मालमत्तेवरून सुरू असलेला वाद, तसेच त्यातून झालेला कथित अपमान व शिवीगाळ यांच्या रागातून प्रज्योतने संबंधित घर उध्वस्त करण्याचा निर्णय घेतला होता. जेसीबीसारख्या यंत्राचा वापर केल्यास विरोध होईल या भीतीने ब्लास्टींगचे ज्ञान असलेल्या साथीदारांच्या मदतीने जिलेटीन कांड्याचा वापर करून हा स्फोट घडवून आणल्याचा तपासात दावा करण्यात आला आहे.
या प्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना स्फोटक साहित्य कोठून मिळाले आणि या कटात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे. ही धडक कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक आण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलिस अधिकारी आप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहा.पोलिस निरीक्षक सागर वाघ व त्यांच्या पथकाने पार पाडली.
