कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत यशस्वी छडा लावला आहे. स्वतःच्याच घरात चोरी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी अटक केली. महे गावातील शकुंतला हिंदुराव वाईंगडे यांच्या घरातून कपाटात ठेवलेले १५ ते २२ ऑगस्टदरम्यान लांबवलेले तब्बल ५ लाख २५ हजार रुपये किमतीचे ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे चितक हे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. या प्रकरणी महे येथीलच बृध्दीराज हिंदुराव वाईंगडे (वय ३४) या संशयित आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.

​महे येथील चोरीप्रकरणी काल रविवारी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली. दरम्यान, आरोपी पाडळी खुर्द येथील नृसिंह तरुण मंडळाजवळ येणार असल्याची खात्रीशीर माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून वाईंगडे याला ताब्यात घेतले. पंचांसमक्ष केलेल्या तपासात त्याच्याकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

​पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या सूचनेनुसार आणि अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली. ​या धडक कारवाईत पोलीस अंमलदार महेश बांबळे, रणजित पाटील, विजय तळसकर, श्रीधर जाधव, प्रकाश कांबळे, सोमराज पाटील, अमोल चव्हाण, प्रविण बोरचाटे व आत्माराम शिंदे यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश बांबळे करत आहेत. करवीर पोलिसांच्या या जलद आणि धडाकेबाज कामगिरीची चर्चा होत आहे.

चोरी करून मौजमजा

बृध्दीराज हिंदुराव वाईंगडे (वय ३४) या संशयित आरोपीने स्वतःच्याच घरामध्ये चोरी केली. त्यातील पैशातून त्यांनी दुचाकी, मोटार खरेदी केली. गोवा येथे जाऊन मौजमजा केली. चोरी करून मौजमजा करणारा हा संशयित तरुण अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे.