कोल्हापूर : एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यात एक कोटी वृक्ष लागवड करण्याची घोषणा केली जात असताना दुसरीकडे कासारवाडी (ता. हातकणंगले) येथे वनपरिक्षेत्रात पर्यावरण नियमांना धाब्यावर बसवत ३०० वृक्षांची कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याच वनक्षेत्रात ५०० मीटर लांबीचा विनापरवाना रस्ता बनवून गौण खनिजाची अवैधरित्या लूट करण्यात आली आहे. या प्रकारा विरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार नोंदवल्यानंतर वनविभागाने गुन्हा दाखल केला आहे. तर आज शुक्रवारी वृक्ष तोडलेल्या जागेवरच पुन्हा झाडे लावण्याचे काम वनविभागाने सुरू केले आहे.

कासारवाडी येथील गट क्र. ६३० मधील संरक्षित वनक्षेत्रात गवा, बिबट्या, रानडुक्कर, कोल्हा, लांडगा यांसारख्या वन्यप्राण्यांचावावर असतो. गेल्या ३० वर्षांपासून असलेल्या सुमारे ३०० झाडांची कत्तल करून जंगल उद्ध्वस्त करण्यात आले आहे. या वृक्षतोडीतून मार्ग काढत अर्धा किलोमीटर लांबीचा रस्ता बनवून त्याद्वारे गौण खनिजाची अवैध उत्खनन करून चोरी केली जात आहे.

याबाबत ग्रामपंचायत कासारवाडी व वनहक्क व्यवस्थापन समितीच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ वन विभागाला याची माहिती दिली. त्यानुसार वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. या प्रकरणातील दोषींवर तात्काळ कारवाई करूनपुन्हा वृक्षारोपण करावे, अशी मागणी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली. कोल्हापुरातील प्रजासत्ताक सामाजिक संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनीही याबाबत तक्रार केली होती.

यानंतर वनविभागाने हातकणंगले पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर ग्रामस्थांच्या मागणीनुसार वृक्षतोड झालेल्या ठिकाणी आज पासून झाडे लावण्यास सुरुवात झाली आहे. रस्त्या केलेल्या ठिकाणी जेसीबी यंत्रकारावी मोठी चर खोदण्यात आल्याने येथून रस्ता वाहतूक होण्याची शक्यताही अंधुक झाली आहे.

एक कोटी झाडे लावणार

हरित महाराष्ट्र आयोग अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात प्रतिवर्षी ५ लाख वृक्ष लागवड याप्रमाणे २ वर्षात टप्प्या टप्प्याने म्हणजेच १ कोटी ५ लाख इतक्या मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या लागवडीसाठी संबंधित यंत्रणांनी येत्या १३ जुलैपर्यंत वृक्ष लागवडीचे योग्य नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले. वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने शाहूजी सभागृहात जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राठोड म्हणाले, जिल्ह्यातील वृक्ष लागवड मोहिमेला गती द्यावी. त्याचबरोबर संबंधित विभागांना वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने देण्यात आलेले उद्दिष्ट केवळ पूर्ण करू नये तर ते वृक्ष जगावेत, त्यांची जोपासना योग्य पद्धतीने होईल यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही केल्या. सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी किशोर येळे यांनी जिल्ह्यात वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने करण्यात येणारी सर्व रोपे (वृक्ष) सामाजिक वन विभागामार्फत मोफत देणात येणार असल्याचे यावेळी सांगितले.या बैठकीसाठी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, मनपा उपायुक्त परितोष कंकाळ, इचलकरंजी मनपा उपायुक्त नंदू परळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, पोलीस उपाधिक्षक (गृह) श्रीमती सुवर्णा पक्की, जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयंत उगले, सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका दळवी, पाटबंधारे विभागाच्या उप कार्यकारी अभियंता आरती बारटके, महावितरणचे सहाय्यक अभियंता अनुराग डोईजड यांच्यासह संबंधित विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.