कोल्हापूर : कोल्हापूरचे सांस्कृतिक वैभव असलेले संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आगीत बेचिराख झाल्यानंतर मुख्यमंत्री, महापालिका प्रशासन, सर्वपक्षीय नेते यांनी पूर्वीच्या वैभवाला साजेशी पुनर्बांधणी करण्याची घोषणा केली. महिन्याभरानंतर एकूणच प्रवास कूर्मगतीने सुरू आहे. निधीच्या घोषणा करून वेळ मारून नेली जात आहे. आगीचे कारण शोधण्यासाठी नियुक्त केलेल्या महापालिकेच्या समितीला आगीचे धड कारणही शोधता आले नाही. आपल्याच यंत्रणेला दोषमुक्त करणारी ही कृती असल्याची टीका केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणी व संवर्धन कृती समितीने केली आहे. पोलीस तपासातून काहीही निष्पन्न झालेले नाही.
राजर्षी शाहू महाराज यांनी उभारलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला ८ ऑगस्ट रोजी रात्री आग लागली. ऐतिहासिक ठेवा नजरेसमोर बेचिराख होताना पाहण्याची वेळ कोल्हापूरकरांवर आली. त्यामुळे नाट्यगृहाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या कोल्हापूर महापालिकेवर टीकेचा आगडोंब उसळला. पाठोपाठ बड्या नेत्यांचे दौरे होऊन घोषणांचा वर्षाव झाला. नाट्यगृह बांधणीसाठी २५ कोटींचा निधी देण्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली. या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वासन दिले. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी काँग्रेसच्या आमदार -खासदार यांच्याकडून पाच कोटी रुपयांचा निधी देण्याचे पत्र जिल्हा नियोजन समितीकडे सादर केले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही एक कोटीचा निधी द्यावा, असे पत्र सादर केले. कोल्हापूरकरांनी नाट्यगृह बांधण्यासाठी निधी संकलित करण्याची तयारी दर्शवली आहे.
हेही वाचा : हातकणंगलेत ताराराणी पक्षाच्या जयश्री कुरणे यांची उमेदवारी
महापालिकेची कुचराई
एकूणच नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी निधीची कमतरता दिसत नाही. मात्र गेल्या महिन्याभरात याबाबतच्या हालचाली कूर्मगतीने सुरू आहेत. नाट्यगृहाच्या ठिकाणचा मलबा विम्याच्या कायदेशीर बाबीचे कारण देऊन कोल्हापूर महापालिकेने तसाच ठेवला आहे. आग लागल्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी रंगकर्मी, सामाजिक कार्यकर्त्यांनाच कंबर कसावी लागली. दबावामुळे उशिरा जाग आलेल्या महापालिका प्रशासनाने अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला. या दोन्हीबाबत कोल्हापूर महापालिकेची कुचराई प्रकर्षाने पुढे आल्याने त्या विरोधात तीव्र टीका होत आहे.
सादरीकरणाबाबत मतभेद
समाधानाची एकच गोष्ट म्हणजे नाट्यगृह उभारणीबाबत जिल्हा प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत. याचे प्राथमिक सादरीकरण नुकतेच झाले आहे. नाट्यगृह कशा पद्धतीने उभारले पाहिजे हेच सांगितले गेले नसल्याने वेगवेगळ्या रूपातील सादरीकरण झाले. त्याबाबत रंगकर्मींमध्ये मतांतरे असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत दिसून आले. काहींनी नाट्यगृह पूर्वीप्रमाणेच उभारले पाहिजे असे मत व्यक्त केले आहे. तर काहींनी काळाशी सुसंगत ठरणारे अद्ययावत नाट्यगृह उभारले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. हा तिढा सोडवणे हे शासन – प्रशासनासमोरची डोकेदुखी ठरणार असे दिसत आहे.
हेही वाचा : कोल्हापूर : ट्रक – मोटार अपघातात ३ तरुण ठार; चौघे जखमी
लोकांचा आवाज रस्त्यावर
नाट्यगृह पुनर्बांधणीकडे दुर्लक्ष होत असल्याने लोकांचा आवाज रस्त्यावर येऊ लागला आहे. केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणी व संवर्धन कृती समितीने मेणबत्ती पेटवून प्रशासनाचा निषेध केला आहे. या कृती समितीचे अध्यक्ष बाबा इंदुलकर म्हणाले, राजर्षी शाहू महाराज यांनी उभारलेल्या नाट्यगृहाच्या अस्मितेला गोंजारण्याचे काम राजकारण्यांनी चालवलेले आहे. विधानसभा निवडणुकीत या मुद्द्याचा फटका बसू नये यासाठी घोषणा करून वेळ मारून न्यायचे काम चालवलेले आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्वांना विश्वासात घेऊन पुनर्बांधणी केली जाईल, असे आश्वासन दिले असले तरी प्रशासनाच्या कृतीमध्ये त्याचा अभाव जाणवत आहे. एकूणच याबाबतीत कोल्हापूरकरांची फसवणूक सुरू असून शासनाला गांभीर्य दिसत नाही, अशी टीका त्यांनी केली.
प्रगती असमाधानकारक
केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणीबाबतची प्रगती असमाधानकारक आहे. केवळ निधीची घोषणा झाली आहे. सादरीकरणात उणीव जाणवत आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी नव्याने नाट्यगृह बांधायची वेळ आली असती तर आणखी सुधारणा करून बांधा अशा सूचना केल्या असत्या. त्या दृष्टीने नाट्यकर्मींना अपेक्षित असणाऱ्या गरजा लक्षात घेऊन नियोजन केले पाहिजे.
आनंद कुलकर्णी (अध्यक्ष, कोल्हापूर नाट्य परिषद)