कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीचा तपास सुरू आहे या टिपणीखाली प्रलंबित आहे. परंतु, ही आग फॉरेन्सिक अहवालानुसार ज्वालाग्राही पदार्थामुळे ( पेट्रोलियम हायड्रोकार्बन) लागल्याचा असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. आग शॉर्ट सर्किटमुळे लागलेली नाही. ती जाणीवपूर्वक संगनमताने लावण्यात आल्याचे यावरून स्पष्ट होत असल्याने या प्रकारामध्ये घातपात घडवण्यात आला आहे, असा आरोप काँग्रेसचे विरोधी महापालिकेतील विरोधी पक्ष नेते राजेश लाटकर यांनी बुधवारी केला आहे.
याबाबत काँग्रेस सह महाविकास आघाडीच्या वतीने पोलीस अधीक्षकांकडे याबाबतची सखोल तपासणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या कलेचा वारसा असलेले संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह बेचिराख करणाऱ्यांना कडक शासन झाले पाहिजे. याचा सखोल तपास होवून गुन्हेगारांना चप्पल घालून गाढवावरून धिंड काढण्यात आली पाहिजे, अशी मागणी लाटकर यांनी केली.
कोल्हापूरमधील ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीबाबत गंभीर बातमी समोर आली आहे. यासंदर्भातील याबाबत आपली भूमिकामांडताना लाटकर म्हणाले की, ८ ऑगस्ट २०२४ रोजी कोल्हापूरमधील ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागून ते जळून खाक झाले होते. ज्यामुळे कोल्हापूरकरांच्या भावनांना मोठा धक्का बसला होता. ही कोणतीही अपघाती किंवा शॉर्ट सर्किटमुळे झालेली घटना नसून हा पूर्णपणे घातपात असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
फॉरेन्सिकचा रिपोर्ट
माहिती अधिकाराच्या माध्यमातून जुना राजवाडा पोलीस स्टेशनमधील गुन्ह्याच्या तपास टिपणाबाबत आणि फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टबाबत माहिती मागवली असता, त्यामध्ये धक्कादायक बाब समोर आली आहे. फॉरेन्सिक अहवालानुसार, नमुन्यांमध्ये पेट्रोलियम हायड्रोकार्बन (पेट्रोलजन्य व ज्वालाग्रही पदार्थ) असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. आग शॉर्ट सर्किटमुळे लागलेली नसून ती जाणीवपूर्वक लावण्यात आल्याचे यावरून स्पष्ट होते, असे लाटकर म्हणाले.
कागदपत्रांचा संशय
नाट्यगृहाच्या सुशोभीकरणाच्या कामात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाबाबत काही तक्रारी आणि चौकशी अहवाल तयार करण्यात आले होते. ती कागदपत्रेही याच वास्तूमध्ये होती. या सर्व षडयंत्रामागची सत्य परिस्थिती अद्याप समोर आलेली नाही, असेही ते म्हणाले.
प्रशासनाला इशारा
घटनेला इतका काळ लोटूनही तपासाला अपेक्षित वेग मिळालेला नाही. त्यामुळे काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीच्या वतीने पोलीस प्रमुखांना निवेदन देऊन या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची आणि खरे गुन्हेगार लवकरात लवकर शोधून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जाणार असल्याचे लाटकर यांनी स्पष्ट केले.
