कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील प्राचीन स्थापत्यशास्त्राचा अमूल्य ठेवा असलेल्या खिद्रापूर येथील प्रसिद्ध श्री कोपेश्वर मंदिर परिसरात विकासकामांवेळी मातीचे उत्खनन करत असताना प्राचीन शिल्पांचा एक अत्यंत दुर्मीळ ठेवा हाती लागला आहे. बाराव्या शतकातील शिलाहारकालीन आणि छोटे खजुराहो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिराच्या वायव्य कोपऱ्यात आणि उजव्या पाठीमागील भागात खोदकाम सुरू असताना हा ऐवज आढळला आहे. हा शिल्पठेवा नेमका कोणत्या कालखंडातील व कोणत्या संस्कृतीशी संबंधित आहे हे तज्ज्ञांच्या सखोल अभ्यासानंतरच स्पष्ट होणार आहे.
यामध्ये एका नंदीची मूर्ती, बालकाला कडेवर घेतलेल्या स्त्रीचे सुबक कोरीव शिल्प तसेच बुद्धसदृश मुखाकृती असलेल्या मूर्तीचा समावेश आहे.
यामुळे या परिसराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाला पुन्हा एकदा मोठे बळ मिळाले आहे. सध्या हे मौल्यवान अवशेष मंदिर परिसरातच उघड्यावर ठेवले असून काही अवशेष पुरातत्व विभागाचे स्थानिक अधिकारी विकास मौर्य यांच्याकडे सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. हे सर्व मौल्यवान अवशेष पाहण्यासाठी स्थानिकांसह परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या ऐतिहासिक वारशाचे महत्त्व लक्षात घेता या सर्व शिल्पांचे तातडीने अधिकृत छायाचित्रण, अचूक मोजमाप व शास्त्रीय पुरातत्त्वीय परीक्षण करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.
हे सर्व अवशेष तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलवून त्यांची दफ्तरी नोंद करून घ्यावी आणि यापुढील सर्व उत्खननाचे काम पुरातत्त्वतज्ज्ञांच्या प्रत्यक्ष देखरेखी खालीच पार पाडले जावे अशी मागणी जोर धरत आहे. कोपेश्वर भूमीत सापडलेला हा शिल्पठेवा नेमका कोणत्या कालखंडातील व कोणत्या संस्कृतीशी संबंधित आहे हे सखोल अभ्यासानंतरच स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत या ऐतिहासिक वारशाचे रक्षण करणे प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असताना आणि इतका महत्त्वाचा पुरातत्त्वीय ऐवज हाती लागूनही उत्खननस्थळी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे अधिकारी किंवा कोणतीही जबाबदार व्यक्ती प्रत्यक्ष उपस्थित नसल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे.
योग्य मार्गदर्शनाअभावी सुरू असलेल्या या कामामुळे या प्राचीन अवशेषांचे नुकसान होण्याची दाट भीती व्यक्त केली जात आहे. खरे तर महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अधिपत्याखाली सध्या कोपेश्वर मंदिराच्या विविध विकासकामांना सुरुवात झाली असून याद्वारे मंदिराची संरक्षक भिंत बांधणे, पदपथ तयार करणे, मंदिर परिसराचे सुशोभिकीकरण करणे तसेच मंदिराच्या संरचनात्मक सुरक्षिततेचे लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिटचे) काम हाती घेण्यात आले आहे. याच विकासकामांतर्गत संरक्षक भिंत परिसरातील माती काढण्याचे काम सुरू असताना हे ऐतिहासिक अवशेष व शिल्पे आढळून आली आहेत.
त्यावर अतिशय सूक्ष्म अशी कलाकुसर केलेली असून या संपूर्ण परिसरात आणखीही अनेक ऐतिहासिक अवशेष दडलेले असण्याची मोठी शक्यता इतिहासप्रेमींनी वर्तवली आहे. हा शिल्पठेवा नेमका कोणत्या कालखंडातील व कोणत्या संस्कृतीशी संबंधित आहे हे तज्ज्ञांच्या सखोल अभ्यासानंतरच स्पष्ट होणार आहे.
