scorecardresearch

खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराच्या दुरुस्तीला ११० कोटींचा निधी देणार – आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर

खिद्रापूर कोपेश्वर मंदिरासाठी यापूर्वी साडेबारा कोटीच्या निधीची तरतूद केली होती.पण आता या मंदिराच्या इमारतीला भेगा पडल्याचं दिसून आल्याने सध्या चर्चा सुरू आहे.

कोल्हापूर : खिद्रापूर (ता.शिरोळ) कोपेश्वर मंदिराची पुरातत्व विभागाच्या सल्ल्यानुसार तत्काळ दुरुस्तीला सुरवात करणार असून, ११० कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केली. खिद्रापूर कोपेश्वर मंदिराची रविवारी राज्यमंत्री पाटील-यड्रावकर यांनी पाहणी केली. या मंदिराच्या शिळेला भेगा पडल्याचं दिसून आलं होतं.


यावेळी ते म्हणाले की, खिद्रापूर कोपेश्वर मंदिरासाठी यापूर्वी साडेबारा कोटीच्या निधीची तरतूद केली होती. मंदिराच्या दुरुस्तीसाठी शनिवारी संध्याकाळी जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या अध्यक्षतेखाली झालेली बैठकीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्सचे मुख्य सभापती शिखा जैन, किरण कलमदानी यांनी दुरुस्तीचा आराखडा तयार केला असून, यासाठी ११० कोटींच्या निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले आहे.


यापूर्वी ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून आणखी अपेक्षित असलेल्या १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊन शिल्प वैभवाची लवकरच दुरुस्ती करून घेणार असल्याचे त्‍यांनी सांगितले. सरपंच हैदरखान मोकाशी, दयानंद खानोरे, जब्बार मोकाशी यांनी मंदिराच्या विदारक परिस्थितीची माहिती दिली. पोलीस पाटील दिपाली पाटील, सचिन पाटील, हिदायत मुजावर, अमजद मोकाशी आदी उपस्थित होते.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kolhapur khidrapur temple rajendra patil yadravkar 110 crore funding vsk