कोल्हापूर : कोल्हापूर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे अशा संततधार पावसातही निसर्गाची नवलाई पाहायला मिळत आहे. पाऊस वाढला आहे तसा कुरुंदवाडच्या तबक उद्यानात पिवळ्या बेडकांचा कलबलाट सुरू झाला आहे. उद्यानात साठलेल्या पाण्यात अचानक मोठ्यासंखेने पिवळ्या धमक रंगाचे बेडूक अवतरले आहेत. एरवी पावसाळ्यात काळ्या किंवा तपकिरी रंगात दिसणारे बेडूक अचानक एवढ्या मोठ्या संख्येने आणि तेही पिवळ्या रंगात दिसल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य, कौतुक व्यक्त होत आहे. ही बेडके पाहण्यासाठी गर्दी होत आहे.
शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड या नगरपालिकेच्या शहरात ऐतिहासिक तबक उद्यानात आज पहाटेपासून नागरिकांना निसर्गाचा एक आगळावेगळा चमत्कार पाहायला मिळाला. उद्यानात साठलेल्या पाण्यात अचानक मोठ्या संखेने पिवळ्या धमक रंगाचे बेडूक अवतरले आहेत. एरवी पावसाळ्यात काळ्या किंवा तपकिरी रंगात दिसणारे बेडूक अचानक एवढ्या मोठ्या संख्येने आणि तेही पिवळ्या रंगात दिसल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य आणि कौतुक व्यक्त होत आहे.
हे बेडूक कुठूनही स्थलांतर करून आलेले नाहीत, तर ते याच परिसरात जमिनीखाली सुप्त अवस्थेत होते. मान्सूनच्या पहिल्या जोरदार पावसानंतर जमिनीतील उष्णता कमी होते आणि पाण्याचे साठे तयार होतात. अशा वेळी हे बेडूक प्रजननासाठी जमिनीबाहेर पडतात. सर्व बेडूक एकाच वेळी प्रजननासाठी बाहेर पडल्याने अचानक त्यांची संख्या मोठी दिसते, असे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे.
प्रजनन काळातील बदल
नर बेडूक मादी बेडकांना आकर्षित करण्यासाठी पावसाळ्याच्या सुरुवातीला आपला नेहमीचा रंग बदलून गडद पिवळा करतात. प्रजननाचा काळ संपला की ते पुन्हा आपल्या मूळ तपकिरी रंगात येतात. या बेडकांचा आवाज खूप मोठा असतो. नर बेडूक आपल्या घशातील ‘व्होकल सॅक’ फुगवून जोरात आवाज काढतात. हा आवाज मादी बेडकाला प्रजननासाठी साद घालण्यासाठी असतो.
पर्यावरणास उपयुक्त
हे बेडूक विषारी नसतात आणि पर्यावरणासाठी, विशेषतः शेतातील कीटक नियंत्रणासाठी अत्यंत उपयुक्त मानले जातात. त्यामुळे नागरिकांनी त्यांना इजा न करता निसर्गाच्या या सुंदर रूपाचा आनंद घ्यावा,असे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे.
