कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या संवर्धनाच्या वादावर आता न्यायालयाने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग, महाराष्ट्र शासन तसेच जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ३ ऑगस्ट रोजी त्यांना आपले म्हणणे मांडण्यास न्यायालयाने सांगितले आहे.
मंदिरात चाललेल्या संवर्धनातील त्रुटींवरती प्लेसेस ऑफ वर्षीप ॲक्ट १९९३ नुसार १५ ऑगस्ट १९४७ रोजी मंदिर जसे होते त्या अवस्थेमध्ये संवर्धित करून देण्याकरता गजानन विश्वनाथ मुनीश्वर व शिवकुमार शिंदे यांच्या वतीने येथील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्याकडे आज दावा दाखल करण्यात आला होता. वादी यांची बाजू ऐकून घेऊन आज न्यायालयाने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग, महाराष्ट्र शासन व जिल्हाधिकारी कोल्हापूर या चारही प्रतिवादींना कारणे दाखवा नोटीस बजावून आपली बाजू मांडण्याचे निर्देश दिले. याबाबत पुढील सुनावणी दिनांक ३ ऑगस्ट रोजी होणार आहे. वादी यांच्या वतीने ॲडव्होकेट नरेंद्र गांधी व ओमकार गांधी प्रसन्न मालेकर यांनी काम पाहिले.
संवर्धन कामावरून वाद
महालक्ष्मी मंदिरातील सुरू असलेल्या संवर्धन कामांबाबत आवाज उठवला जात आहे. याची दखल घेऊन जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कामातील त्रुटींवरून बैठकीत वातावरण चांगलेच तापले होते. जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी भावना लक्षात घेऊन संवर्धनाच्या कामामध्ये आवश्यक सुधारणा करण्याची, ग्वाही दिली. मंदिर संवर्धनाच्या आक्षेप असलेल्या कामांची तांत्रिक तपासणी करून दोषी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात येईल. देवीच्या जुन्या रथाची चांदी देवस्थान समितीकडे सुरक्षित आहे. धार्मिक भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेत संवर्धनाचे काम शास्त्रीय पद्धतीने केले जाईल. चुकीच्या कामांचा अहवाल तयार करण्यात येईल. असे आश्वासन त्यांनी दिले.
दिलीप देसाई यांनी ग्राइंडर, ब्रेकरसारख्या यंत्रांचा वापर करून काम सुरू असल्याबद्दल आक्षेप घेत ऐतिहासिक मातृलिंग हलविणे, मंदिराच्या ऐतिहासिक वारशाचे नुकसान, ऐतिहासिक हौद पाडल्याचा आरोप केला. मंदिर, मूर्ती शास्त्र अभ्यासक वकील प्रसन्न मालेकर यांनी, दरवर्षी मूर्तींचे संवर्धन का केले जाते, यावर प्रश्न उपस्थित करत संवर्धनादरम्यान धार्मिक विधींचे पालन होत नसल्याची टीका केली.सहाय्यक संचालक डॉ. विलास वाहणे यांनी मुख्य मंदिराचे शास्त्रीय पद्धतीने जतन व संवर्धनाचे काम सुरू असल्याचे सांगितले. विजय देवणे यांनी पुरातत्त्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, सहाय्यक संचालक डॉ. विलास वाहणे हे मंदिर संवर्धनाच्या कामासाठी जबाबदार असल्याने त्यांना कामातून बाजूला करून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.
मंदिराची बदनामी नको – क्षीरसागर
बैठकीत हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष गजानन तोडकर, वसंतराव मुळीक, माजी महापौर आर. के. पोवार, दीपक पाटील, प्रवीण पाटील, बाबा पार्टे, शिंदे सेनेचे हर्षल सुर्वे, किशोर घाटगे, बंडा साळोखे आदींनी विविध प्रश्न उपस्थित करून अधिकाऱ्यांना भंडावून सोडले. मंदिराची बदनामी होणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन आमदार क्षीरसागर यांनी केले.
