कोल्हापूर : दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरात गेल्या दोन दिवसांपासून श्रीपूजक आणि प्रशासनात जोरदार वाद उफाळून आला आहे. मंगळवारी सकाळी महालक्ष्मी मंदिरातील उत्सव मूर्ती अभिषेक व पूजेसाठी गरुड मंडपात नेत असताना कर्मचाऱ्यांनी अडवल्याचा गंभीर प्रकार घडला. यावरून मोठी वादावादी झाली असून शेवटी श्रीपूजकांना मूर्ती परत घेऊन जावे लागले. या घटनेच्या निषेधार्थ आणि प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात श्रीपूजकांनी आज मंदिरात आंदोलन पुकारले.

मंदिरामध्ये पोलीस निरीक्षक आल्यानंतर त्यांच्याशी झालेल्या चर्चा केल्यानंतर वादावर पडदा टाकण्यात आला असून आता मंदिरात सुरळीत व्यवहार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरातील धार्मिक परंपरांमध्ये सातत्याने अडथळे आणले जात असल्याचा आरोप श्रीपूजकांनी केला आहे. आज सकाळी अभिषेकाच्या मूर्तीला रोखण्यापूर्वी, काल रात्री शेजारतीच्या वेळीही आरतीसाठी रस्ता मोकळा करून दिला गेला नव्हता. रोजच्या नित्यनियमाने होणाऱ्या पूजाविधी आणि आरतीमध्ये अशा प्रकारचा हस्तक्षेप होणे हे धार्मिक परंपरा आणि भाविकांच्या श्रद्धेच्या दृष्टीने चुकीचे असल्याचे मत श्रीपूजकांनी व्यक्त केले.

​प्रदक्षिणा मार्ग आणि पूजा साहित्याला अडथळा

मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रदक्षिणा घालण्यासाठी पुरेशी जागा सोडण्यात आलेली नाही. तसेच, दररोज श्रींच्या मूर्तीचे स्नान, अभिषेक आणि दैनंदिन पूजेसाठी लागणारे साहित्य घेऊन येणाऱ्या कर्मचाऱ्यांना व श्रीपूजकांना मंदिरात प्रवेश करताना आणि आत ये-जा करताना नाहक त्रास दिला जात आहे. या मूलभूत अडचणींकडे मंदिर प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे श्रीपूजकांचे म्हणणे आहे.

​मंदिरात आंदोलन

धार्मिक विधींमध्ये वारंवार निर्माण केले जाणारे अडथळे, श्रीपूजकांशी होणारी वादावादी आणि भाविकांची होणारी गैरसोय या सर्व मुद्द्यांवर प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आज श्रीपूजकांनी आक्रमक भूमिका घेत मंदिरात आंदोलन केले. मंदिर प्रशासनाने परंपरेचा आणि धार्मिक विधींचा आदर करून त्वरित सर्व अडथळे दूर करावेत, प्रदक्षिणा मार्ग मोकळा करावा आणि पूजा साहित्याची वाहतूक सुरळीत करावी, अशी जोरदार मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली आहे. या घटनेमुळे आज दिवसभर मंदिर परिसरात तणावाचे वातावरण होते.

बॅरिकेड्समुळ वादावादी

मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर नवरात्र उत्सवाच्या काळात लावण्यात आलेल्या बॅरिकेड्समुळे भाविक आणि पोलीस प्रशासन यांच्यामध्ये वादावादीचे प्रसंग घडत आहेत. प्रदक्षिणा मार्ग हा भाविकांसाठी खुला असणे आवश्यक असून, त्यामुळे भाविकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी सदर बॅरिकेड्स हटविण्याची विनंती करण्याकरिता हिंदू जनसंघर्ष समिती आज पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीला भेट देणार आहे, असे हिंदू जनसंघर्ष समिती, कोल्हापूर यांनी सांगितले.