कोल्हापूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिराच्या मूळ ढाच्याला बाधा येणार नाही अशा पद्धतीने पुरातत्व विभागाने या मंदिरा संदर्भातील कामकाज करावे, असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी येथे दिले. गेली काही दिवस मंदिराच्या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ते, हिंदुत्ववादी संघटनांनी तक्रारी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संबंधिताची आढावा बैठक आयोजित केली होती.
यावेळी आमदार अमल महाडीक, चंद्रदीप नरके, अशोक माने, मनपा आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. विलास वहाने, देवस्थान समितीच्या सचिव वर्षा साळूंखे उपस्थित होते .
पालकमंत्री आबिटकर म्हणाले, मंदिर ही वास्तू असली तरी त्यावर लाखों भाविकांची श्रद्धा आहे, या मंदिरामध्ये भक्तांच्या भावना गुंतलेल्या आहेत. मंदिराचे जतन आणि संवर्धन करत असताना पुरातत्व विभागाने याबाबत नियमांच्या पलिकडे जाऊन त्याचा विचार करावा. कामाचा वेग वाढवून नवरात्र उत्सवापूर्वी अधिकाधिक कामे वेगाने पूर्ण करावीत. मात्र ती करत असताना गुणवत्तेकडे लक्ष द्यावे.
गरुड मंडपाची उभारणीही वेळेत करावी, असे निर्देश त्यांनी दिले. त्याचबरोबर किरणोत्सवाला कोणतीही बाधा येणार नाही याची दक्षता घ्यावी अशी सूचनाही केली.
संवर्धन मानांकन पाळूनच
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी मंदिर आराखड्यांतर्गत येणाऱ्या मिळकतींची माहिती दिली. भूसंपादनासाठीच्या पहिल्या टप्प्यात ८९ नागरी,१९५ व्यावसायिक तर ५३ मिश्र अशा स्वरुपाच्या मिळकती आहेत. या मंदिर परिसरात असल्याचे सांगून याबाबत मिळकत धारकांसोबत चर्चा करून पुढील कार्यवाही केली जाईल, असे स्पष्ट केले.पुरातत्व विभागाकडून मंदिराचे जतन आणि संवर्धन हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानांकन पाळूनच केले जात असल्याचे विलास वाहने यांनी या बैठकीत स्पष्ट केले. यावेळी इतर अधिकारी उपस्थित होते.
तक्रारी कोणत्या?
दरम्यान, कोल्हापूरच्या करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरातील संवर्धन व जतन कामांवर धार्मिक व सामाजिक संघटनांनी आक्रमक आक्षेप घेत ऐतिहासिक वारशाचे नुकसान, यंत्रांचा अयोग्य वापर आणि धार्मिक विधींकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार नोंदवली आहे. याप्रकरणी न्यायालयाने प्रशासनाला नोटीस बजावली असून वाद वाढला आहे. संवर्धनादरम्यान ग्राइंडर आणि ब्रेकरसारख्या घातक यंत्रांचा वापर करून ऐतिहासिक वास्तू व मातृलिंगाला धक्का पोहोचवल्याचा आरोप आहे. मंदिराच्या शिखरावरील कामाआधी आवश्यक ‘तत्त्वचलन’ व धार्मिक विधी न पाळल्याची श्रीपुजकांची तक्रार आहे. जुना ऐतिहासिक हौद पाडणे आणि मंदिराचे मूळ स्वरूप बदलत असल्याचा दावा केला जात आहे. दुरुस्तीचे काम सुरू असतानाही मंदिराच्या काही भागांत गळती कायम असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
