कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरात पाणी गळती होऊ लागल्याने भाविकातून नाराजी व्यक्त केली जात आहे. १५०० कोटीच्या महालक्ष्मी मंदिर विकास आराखड्याचे भूमिपूजन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आल्यानंतरही या कामातील गंभीर त्रुटी पुढे आल्या आहेत. तर, मंदिरातील काही भागात झालेली पाणीगळती ही जतन-संवर्धनाच्या कामाच्या गुणवत्तेचे अपयश नसून, नियोजित जल प्रतिबंधकचे (वॉटरप्रूफिंग) काम पूर्ण होण्यापूर्वी पावसाळा सुरू झाल्यामुळे निर्माण झालेली तात्पुरती परिस्थिती असल्याचे पुरातत्त्व विभागाने मंगळवारी स्पष्ट केले आहे.
त्यावर सत्ताधारी शिवसेनेनेने टीका करून याला पुरातत्व विभागाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याची टीका केली आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात मंदिर विकास आराखड्यांतर्गत पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली संवर्धनाचे काम सुरू आहे. पावसामुळे मंदिराच्या छतावरून आणि काही अंतर्भागात पाणी झिरपत आहे. तसेच, छतातून पाणी गळती होत असल्याचे समोर आले आहे. कामादरम्यान सिमेंट काढताना ग्राइंडर वापरल्याने मूळ दगडी शिल्पांचे व रचनेचे नुकसान झाल्याचा आणि मंदिरामध्ये पाणी साचल्याचा आरोप भाविकांनी केला आहे. मंदिर विकास आराखड्यामध्ये सुरु असलेल्या कामाची, गळती कशामुळे लागली याची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही केली जात आहे.
जलगळती प्रतिबंधकचे काम
पावसाळा सुरू होण्यापूर्वी कासव मंडपाच्या छताचे जलगळती प्रतिबंधक काम पारंपरिक चुना-आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्ण करण्यात आले आहे. सद्यस्थितीत या भागात कोणत्याही प्रकारची पाणीगळती आढळून आलेली नाही. महासरस्वती व महाकाली मंदिरांच्या छतावरील जलगळती प्रतिबंधक कामाच्या पूर्वतयारीसाठी जुन्या मोजॅक पद्धतीच्या फरशी काढण्यात आल्या होत्या. त्यानंतर जलगळती प्रतिबंधकचे काम हाती घेण्याचे नियोजन होते.
दरम्यान पावसाळा सुरू झाल्यामुळे हे काम पूर्ण करता आले नाही. त्यामुळे पहिल्या पावसात काही ठिकाणी पाणीगळती झाली. ही बाब निदर्शनास येताच संबंधित छत तातडीने ताडपत्रीने सुरक्षितरीत्या झाकण्यात आले. त्यानंतर झालेल्या पावसात कोणतीही नवीन पाणी गळती आढळून आलेली नाही. पावसाळा संपल्यानंतर या भागातील उर्वरित जलगळती प्रतिबंधकचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात येणार आहे, असे पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या पुणे विभागाच्या सहाय्यक संचालकांनी स्पष्ट केले आहे.
शिवसेनेचा ‘पुरातत्व’वर ठपका
दरम्यान पुरातत्व विभागांच्या विभागाने महालक्ष्मी मंदिरात सुरू केलेल्या कामावर एकनाथ शिंदे शिवसेनेने प्रश्नचिन्ह लावले आहे या पक्षाचे हर्षल सुर्वे यांनी पुरातत्त्व विभागाच्या हलगर्जीपणामुळे महालक्ष्मी मंदिरात गळती होत असल्याचा आरोप केला आहे या विभागाकडे पुरेशी अधिकारी नाही त्यांचे या कामाकडे दुर्लक्ष होत आहे. कंत्राटदार, कामगार अशा कामाबाबत अनुभवी नाहीत. मंदिरातील खांबांवर लहान मूर्ती, नाजूक नक्षीकाम असल्याने काम जपून करणे गरजेचे होते. हा भाग ग्रायंडरने कापून काढला गेला. मूळ मंदिराच्या कामाला बाधा आणण्याचे काम पुरातत्व विभागाकडून केले जात आहे. याला आम्ही आक्षेप घेतला आहे. याबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडे योग्य व्यक्तीकडे ही काम सोपवावे अशी मागणी करणार असल्याचे सुर्वे यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.
