कोल्हापूर : अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत मावळते अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांना कोल्हापूरच्या चित्रकर्मींचे आव्हान असणार आहे. याशिवाय ११ अपक्ष उमेदवारांनी आपल्याला तिसऱ्या आघाडीच्या हालचाली शुक्रवारी सुरू झाल्या होत्या.

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी १४ जागांकरिता ४४ उमेदवार रिंगणात आहेत. शुक्रवारी चिन्ह वाटप झाले. ही निवडणूक कोल्हापूर विरुद्ध पुणे. मुंबई अशी होण्याचे संकेत आहेत.

मेघराज राजेभोसले यांच्या १४ उमेदवारांच्या समर्थ पॅनलला पतंग चिन्ह मिळाले आहे. तर सतीश रणदिवे यांच्या १४ उमेदवारांच्या चित्रकर्मी पॅनलला कपबशी चिन्ह मिळाले आहे. चिन्ह वाटपानंतर उर्वरित १६ अपक्ष उमेदवारांना त्यांच्या पसंती प्रस्तावानुसार तसेच उपलब्ध चिन्हानुसार निवडणूक मतदानासाठी चिन्ह देण्यात आले. यामध्ये छत्री, टेलिफोन, रेडिओ, शिट्टी, रोड रोलर, फेटा, गिटार, नारळ, दुचाकी, फुलपाखरू, तबला डग्गा आदी चिन्हांचा समावेश आहे. १४ जागांसाठी दोन पॅनलमध्ये चुरस निर्माण झाली आहे.

उद्यापासून प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात होईल. कोल्हापूर विरुद्ध पुणे मुंबई असा सामना रंगणार आहे. एकमेकांच्या विरोधात ताकदीने निवडणूक लढवण्याचा निर्णय चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कलाकारांनी घेतला आहे. मतदान ७ जून रोजी कोल्हापूर, मुंबई आणि पुणे येथे होणार आहे . ८ जून रोजी मतमोजणी व निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे मतदानातला फक्त आठ दिवस उरले आहेत. त्यामुळे दोन्ही पॅनलसह अपक्ष उमेदवार आपलेच मतदानाचे पारडे कसे जड होईल, याकडे लक्ष देऊ लागले आहेत.

मतदार संख्या

जिल्हा निहाय याप्रमाने

  • मुंबई – १२००
  • पुणे – ८४०
  • कोल्हापूर – ५२०
  • इतर जिल्हे – ८४०
  • एकूण – ३४००

बिनविरोध उमेदवार

  • नाव – गट
  • वर्षा उसगावकर – अभिनेत्री
  • विजय खोचीकर – संकलन
  • आनंद शिंदे – संगीत पार्श्वगायन

हालचाली गतिमान

आपलेच पॅनल निवडून यावे म्हणून समर्थ आणि चित्रकर्मी मतदारांशी संपर्क साधायला सुरुवात केली आहे. आपल्या पॅनलचा जाहीरनामा मतदारांसमोर मांडला जात आहे. राज्यभर बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. मतदानाला फक्त आठ दिवस उरल्यामुळे हालचाली गतिमान झाल्या आहेत. १४ जागांसाठी दोन पॅनलमधील २८ उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत होणार आहे.

फटका कोणाला?

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. ६० उमेदवार छाननी नंतर पात्र ठरले. त्यामध्ये १३ उमेदवारांनी माघार घेतली. तर ३ उमेदवार निवडून आले आहेत. त्यात कोल्हापूरचे मतदार मुळातच कमी असून, अपक्ष उमेदवार मत खाणार यात शंका नाही. याचा फटका दोन पैकी कोणत्या पॅनलला बसतो हे पाहणे गरजेचे आहे.