कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुती अंतर्गत जागा वाटपाची रस्सीखेच सुरू आहे. प्रत्येक पक्षाने जागा वाटपाबाबत मोठमोठे आकडे सांगितले आहेत. मित्रपक्षांना विचारात न घेताच परस्पर जागा मागणीचे आकडे जाहीर केले जात असल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
ही परिस्थिती लक्षात घेऊन शुक्रवारी महायुतीचे प्रमुख नेते आज प्रथमच एका मंचावर आले. एकीकडे उमेदवार शोधण्यासाठी मुलाखती घेतल्या जात आहेत. तर त्याची पलीकडे जाऊन आता आज एक वेगळाच निर्णय घेण्यात आला. निवडून येणाऱ्या उमेदवारांचा शोध घेण्यासाठी एक उपसमिती नियुक्त करण्याचा निर्णय महायुतीच्या नेत्यांनी घेतला. या समितीचा अहवाल आल्यावर मग पुढे त्यावर सर्व नेते मिळून अंतिम निर्णय घेणार आहेत. आता या प्रक्रियेमध्ये नेमके किती दिवस जाणार आणि कोणाच्या पदरात किती जागा पडणार याकडे लक्ष वेधले आहे.
निवडणूक महायुती एकत्रित लढणार आहे. महायुतीचा भगवा महापालिकेवर फडकवण्यासाठी मित्रपक्षांचे एकमत झाले आहे. सक्षम उमेदवाराची चाचपणी करण्यासाठी उपसामिती स्थापन करण्याचा निर्णय शुक्रवारी माहितीच्या एका बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.
महायुतीच्या प्रमुख नेत्यांची येथे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झाली.
अशी आहे उपसमिती
या बैठकीत तिन्ही पक्षांची उप समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये युवा शिवसेना पश्चिम महाराष्ट्र प्रमुख ऋतुराज क्षीरसागर, जिल्हा समन्वयक सत्यजित कदम, दक्षिण विधानसभा प्रमुख शारंगधर देशमुख, भाजपचे आमदार अमल महाडिक, प्रा.जयंत पाटील, राष्ट्रवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष आदील फरास, महेश सांवत, संदीप कवाळे यांचा समावेश आहे.
अंतिम निर्णय नेत्यांकडे
उपसमिती प्रत्येक प्रभागातील महायुतीच्या सक्षम उमेदवारांची चाचपणी करून किती जागांवर कोण लढणार याची प्राथमिक चर्चा करणार आहे. उपसमितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रकाश आबिटकर, मंत्री चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक हे वरिष्ठ नेते जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत. आजपर्यंत महायुती अंतर्गत प्रत्येक पक्षाने इतक्या जागा मिळाल्या पाहिजेतच असा दावा केला होता. पण त्या दाव्यामध्ये तथ्य नसल्याने प्रत्यक्षात जागा वाटपाची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे उप समिती कोणा कोणाला भेटून उमेदवार कसा निवडणार हे पाहावे लागणार आहे.
