कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा शासकीय रुग्णालयातील शल्य चिकित्सक कार्यालयाच्या मालकीवरून दोन वरिष्ठ अधिकाऱ्यातील वाद रंगला असताना आता याच शासकीय रुग्णालयातील विकास कामांच्या उद्घाटन जाहिरातीमध्ये राज्याच्या आरोग्य विभागाची धुरा वाहणाऱ्या आरोग्यमंत्र्यांनाच वगळले आहे.
विशेष म्हणजे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे. अशी दोन्ही महत्त्वाची पदे असतानाही आबिटकर यांचे छायाचित्र गुल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
एकीकडे गोकुळ दूध संघाची निवडणूक महायुती म्हणून एकत्रित लढणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे सातत्याने सांगत असतात. पण त्यांच्याच विभागाच्या अधिष्ठातांच्या नावाने प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे छायाचित्र नसल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीमध्ये सारे काही अलबेला नसल्याची चर्चा होत आहे.
कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे सर्वोच्च रुग्णालयात २५० कोटी निधीतून विविध सेवा सुविधा निर्माण केल्या आहेत. त्याचा आज उद्घाटनाचा कार्यक्रम होत आहे. या निमित्ताने राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांच्या नावाने स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर व महापौर रूपाराणी निकम यांच्या ठळक प्रतिमा आहेत. मात्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची प्रतिमा टाळण्यात आली आहे.
प्रकाश आबिटकर यांच्यासह जिल्ह्यातील अन्य लोकप्रतिनिधींचा, अधिकाऱ्यांचा यामध्ये केवळ नामोल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे हसन मुश्रीफ यांच्या वैद्यकीय शिक्षण विभागाला आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची वावडे आहे की मंत्री हसन मुश्रीफ यांनाच आबिटकर यांची अलर्जी आहे याची जाहिरातीच्या प्रतिमेतून वगळल्या गेल्याच्या प्रकारामुळे वेगवेगळे अर्थ राजकीय वर्तुळातून काढले जात आहेत.
माधुरी मिसाळ यांनाही वगळले
कोल्हापूर मधील शासकीय रुग्णालयातील विकास कामांच्या उद्घाटन जाहिरातीमध्ये राज्याच्या आरोग्य विभागाची धुरा वाहणाऱ्या आरोग्यमंत्र्यांनाच वगळले आहे. पण याचबरोबर राज्याच्या शहरी विकास, वाहतूक, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफचे राज्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सह-पालकमंत्री माधुरी मिसाळ यांचेही छायाचित्र नसल्याने त्याचीही चर्चा होत आहे. शासकीय कार्यक्रमात कोणाचे फोटो वापरावेत याच्या राजशिष्टाचाराला फाटा देण्यात आल्याचे सांगत आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या समर्थकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
कार्यक्रम कोणता?
छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या रुग्णालयातील विविध नूतणीकृत सेवा-सुविधांचा लोकार्पण सोहळा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सायंकाळी चार वाजता सीपीआर रुग्णालयात ह परिसरात आयोजित केला आहे.
या कार्यक्रमात लोकार्पण होणाऱ्या सेवा सुविधांची माहिती अशी. इंटेन्सिव्ह रेस्पिरेटरी केअर युनिट आय. आर. सी. यु. संलग्न पल्मनरी लॅबोरेटरी बेड-१० , व्हेंटिलेटर सुविधा, मल्टीपॅरा मॉनिटर, श्वसन विकाराचे अत्यवस्थ रुग्ण व फुफुसासंबंधीच्या आजारांचे निदान व उपचार, सर्जिकल आय. सी. यू, बेड-१६ , व्हेंटिलेटर सुविधा, मल्टीपॅरा मॉनिटर्स, सर्जरी, अपघात (ट्राॅमा) च्या अत्यवस्थ रुग्णांसाठी उपयुक्त, मेडिकल आय. सी. यू., बेड-४० , व्हेंटिलेटर सुविधा, मल्टीपॅरा मॉनिटर, मेडिसिनच्या अत्यवस्थ रुग्णांसाठी उपयुक्त,रोबोटिक आर्मयुक्त फिजिओथेरपी लॅब,पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच शासकीय रुग्णालयात रोबोटिक आर्मद्वारे फिजीओथेरपी होणारे युनिट.रोबोटीक गेट ट्रेनिंग सिस्टीम, फिजिओथेरपी व ऑक्युपेशनल थेरपी अद्ययावत यंत्रसामुग्री.
