कोल्हापूर : कोल्हापुरात महाविकास आघाडीने महापौर उपमहापौर पदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय सोमवारी एका बैठकीत घेतला. आघाडीकडून महापौरसाठी सचिन शेंडे हे तर उपमहापौरपदाचे उमेदवार दुर्वास कदम आहेत. सत्ताधारी महायुतीमध्ये फुट पडल्यास त्याचा फायदा उठवण्याचा निर्णय नगरसेवकांच्या बैठकीत घेण्यात आला.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमदार सतेज पाटील यांनी एकाकी झुंज देत महाविकास आघाडीच्या ८१ पैकी ३५ जागा निवडून आणल्या. ६ फेब्रुवारी रोजी महापौर, उपमहापौर निवड आहे. यासाठी आज महाविकास आघाडीच्या सर्व नगरसेवक आणि नगरसेविका यांची बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी माजी आमदार ऋतुराज पाटील होते. यावेळी महाविकास आघाडीने पूर्ण ताकतीने महापौर उपमहापौर लढण्याचा निर्णय घेण्यात आला. नगरसेवक राजेश लाटकर यांनी सध्या महाविकास आघाडीकडे ३५ तर महायुतीकडे ४६ असे संख्याबळ आहे. मात्र त्यांच्या नेतेमंडळी आणि नगरसेवकात ताळमेळ दिसत नाही. याचा फायदा आपल्याला होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी, महापौर पदासाठी ओबीसी प्रवर्गातील एकूण आठ नावे वाचून दाखवली. यामध्ये विशाल चव्हाण, विनायक कारंडे, सचिन शेंडे, उमेश पोवार, जयश्री चव्हाण, दिलशाद मुल्ला, प्रतिज्ञा उत्तुरे, पुष्पा नरूटे आदींचा सहभाग होता. या सर्वांना त्यांचे मत विचारण्यात आले. सर्वांनी एकमताने निवड समिती जो निर्णय घेईल तो मान्य असल्याचे सांगितले.
उपमहापौर निवडीसाठी सुद्धा निवड समिती निर्णय जो निर्णय घेईल तो मान्य असल्याचे सर्व नगरसेवक आणि नगरसेविका यांनी सांगितले. आमदार सतेज पाटील यांच्यासोबत माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी फोनद्वारे चर्चा करून निर्णय घेण्यात आला. यानंतर महापौर पदासाठी सचिन मारुती शेंडे, तर उपमहापौर पदासाठी जेष्ठ नगरसेवक दुर्वास कदम यांचे नाव जाहीर करण्यात आले.
यावेळी आमदार जयंत तासगावकर माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले. आनंद माने, सूर्यकांत पाटील बुध्दीहाळकर, बाळासाहेब सरनाईक, सुनील मोदी, भारती पोवार, सरलाताई पाटील, संजय पोवार वाईकर, नगरसेवक इंद्रजीत बोंद्रे, संजय मोहिते, प्रतापसिंह जाधव, दुर्वास कदम, सुभाष बुचडे, विनायक कारंडे, प्रशांत खेडकर, सचिन शेंडे, रोहित कवाळे, प्रवीण सोनवणे, विशाल चव्हाण, प्रवीण केसरकर, प्रतिज्ञा उत्तुरे, जयश्री चव्हाण, रूपाली पोवार, स्वाती येवलुजे, जयश्री कांबळे, पुष्पा नरोटे, ऋग्वेदा माने, दिलशाद मुल्ला, स्वाती कांबळे, शुभांगी पाटील, दिपाली घाटगे, अरुणा गवळी, अनुराधा मुळीक, सुषमा जरग, स्वालिया बागवान आदी उपस्थित होते.

