कोल्हापुरात वैद्यकीय साहित्य खरेदीत बनवेगिरी; चौकशीचे आदेश

माहिती अधिकारात प्रकार उघड

कोल्हापूर : प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत या घोटाळ्यावर माहिती अधिकारात मिळालेल्या कागदपत्रांसह माहिती दिली.

करोना चाचणीसाठी लागणारे संच प्रमाणित दर्जाचे न घेता भलतेच संच घेतले असल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी येथे उघडकीस आला. प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत या घोटाळ्यावर माहिती अधिकारात मिळालेल्या कागदपत्रासह भाष्य केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याचे देसाई यांनी यावेळी सांगितले.

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी घशातील स्त्राव तपासणीचे सव्वा कोटी रुपयांचे १२४ संच खरेदी केले. ज्या संस्थेतून हे संच खरेदी केले त्याचा उत्पादन बॅच (वस्तू समुदाय) हा इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या नवी दिल्लीतील संस्थेने प्रमाणित केलेला आहे. मात्र, प्रमाणित संचाऐवजी अप्रमाणित संचाचा वापर शहानिशा न करताच येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेंडा पार्कमधील प्रयोगशाळेमध्ये झाल्याचे समोर आले आहे.

मान्यता नसलेल्या १२४ पैकी ७३ संचांचा वापर झाला आहे, असे माहिती अधिकारात वैद्यकीय महाविद्यालयाने कळवले आहे. त्यामध्ये ‘मिळता जुळता क्रमांक असलेले संच खरेदी केले आहेत’ असे मोघम उत्तर दिले आहे. मात्र, जो क्रमांक त्यांनी उल्लेख केलेला आहे तो मेडिकल कौन्सिलच्या यादीमध्ये प्रमाणित नाही, असे देसाई यांनी सांगितले.

शासनाकडून चौकशी

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्यांनी या निवेदनावर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, असेही देसाई यांनी सांगितले. तर, गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी या प्रकाराची चौकशी करण्यात येईल असे बुधवारी येथे पत्रकारांना सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kolhapur medical equipment purchase scam orders for inquiry aau