​कोल्हापूर : कोल्हापुरातील टोल विरोधी आंदोलन महाराष्ट्रभर गाजले. यकोल्हापूर शहर अंतर्गत टोल आकारणीचे आंदोलन उग्र झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने टोल आकारणीचा निर्णय रद्द केला. परंतु दहा वर्षानंतर पुन्हा एकदा कोल्हापूरात टोलचे भूत जागे होताना दिसत आहे. कोल्हापूर महापालिकेच्या बुधवारी (१७ जून) होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या एम एच ०९ क्रमांकाच्या ( कोल्हापूर जिल्ह्यासाठीचा प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा क्रमांक) वाहनां व्यतिरिक्त इतर सर्व वाहनांवर प्रवेश कर (एन्ट्री टॅक्स) आकारणी करण्याबाबत प्रशासनाकडून मागवण्यात आलेल्या सविस्तर प्रस्तावावर प्रस्तावाचा ठराव चर्चेला येणार आहे.

दरम्यान या विरोधात कोल्हापुरातून आवाज उमटू लागला आहे. कोल्हापूर महापालिकेत महायुतीची सत्ता असताना हा ठराव येत असला तरी कोल्हापूर जिल्हा हिंदू एकता आंदोलनाने या प्रवेश करायला विरोध दर्शवला आहे. दरम्यान, टोल कोल्हापूर टोलविरोधात लढा दिलेल्या कृती समितीनेही याबाबत निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापुरात टोलविरोधी वातावरण तयार होत होताना दिसत आहे.

इचलकरंजीकर कराच्या जाळ्यात

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एम एच ०९ हा कोल्हापूरसाठी तर एम एच ५१ हा इचलकरंजी साठी प्रादेशिक परिवहन विभागाने वाहनांच्या क्रमांकासाठी दिलेला सिरीयल नंबर आहे. कोल्हापूर महापालिका प्रवेश कर आकारताना एम एच ०९ या क्रमांकाच्या वाहनांना मोफत प्रवेश देणार आहे. परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील दुसरी महापालिका असलेल्या आणि पूर्वेकडील हातकणंगले, शिरोळ आदी परिसरासाठी असलेल्या एम एच ५१ या जिल्ह्यातीलच वाहनधारकांकडून प्रवेश कर आकारणी करणार आहेत.

एका जिल्ह्यात राहणाऱ्या दोन नागरिकांना दोन प्रकारची करा बाबत पक्षपाती भूमिका दिसत आहे. काहींकडून कर घेतला जाणार नाही तर इतरांवर प्रवेश कराचा भुर्दंड पडणार आहे. कोल्हापूर महापालिका प्रशासनाने हा ठराव आणताना पुरेसा अभ्यास केला नसल्याचे दिसते. यामुळे इचलकरंजी, हातकणंगले, शिरोळ तालुक्यातून कोल्हापूर महापालिकेच्या या कर आकारणी प्रवेश कर आकारणी बाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

हिंदू ऐकताच विरोध

याप्रकरणी हिंदू एकता आंदोलनाच्या पत्रकामध्ये म्हटले आहे की, कोल्हापूर महानगरपालिकेकडून हिंदू भाविक आणि पर्यटकांवर लादल्या जाणाऱ्या ‘प्रवेश करा’स (एंट्री टॅक्स) कडाडून विरोध केला जात आहे. आधी सुविधा द्या आणि नंतर कर घ्या, अशी सूचना केली आहे. करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी संपूर्ण देशभरातून कोल्हापूर नगरीत येणाऱ्या हिंदू भाविकांवर आणि पर्यटकांवर ‘प्रवेश कर’ (एंट्री टॅक्स) आकारण्याचा
अत्यंत निंदनीय आणि तुघलकी प्रस्ताव येत्या १७ तारखेच्या महानगरपालिकेच्या महासभेत मंजुरीसाठी येत आहे.

हिंदू भाविकांची लूट

महानगरपालिका प्रशासनाचा हा अन्यायकारक निर्णय हिंदू भाविकांची आर्थिक लूट करणारा असून, हिंदू एकता आंदोलन याचा तीव्र शब्दांत निषेध करत आहे आणि याला कडाडून विरोध करेल!महानगरपालिका प्रशासन भाविकांना आणि पर्यटकांना पिण्याचे पाणी, स्वच्छ स्वच्छतागृहे, पार्किंग किंवा
वाहतूक नियंत्रण यांसारख्या कोणत्याही किमान मूलभूत सुविधा देण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. कोणतीही व्यवस्था निर्माण करणे ही स्वतःची जबाबदारी असताना, ती पार न पाडता केवळ वसुलीसाठी हिंदू भाविकांच्या खिशात हात घालणे हा निव्वळ अन्याय आहे.

महानगरपालिकेतील सर्व नगरसेवकांना जाहीर आव्हान आणि इशारा देण्यात येत आहे की,आम्ही महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधींना आणि राजकीय पक्षांना स्पष्ट शब्दात इशारा देत आहोत. १) स्वतःला ‘हिंदुत्ववादी’ म्हणवून घेणाऱ्या नगरसेवकांनी आणि नगरसेविकांनी या महासभेत हिंदू भाविकांवर अन्याय करणाऱ्या या ठरावाला आणि प्रस्तावाला कडाडून विरोध केलाच पाहिजे. केवळ निवडणुकांपुरते हिंदुत्व न मिरवता, हिंदू पर्यटकांच्या आणि भाविकांच्या रक्षणासाठी त्यांनी सभागृहात आपली भूमिका स्पष्ट करावी.

ठराव हाणून पाडू

विरोधी बाकांवर बसलेल्या सर्व नगरसेवकांनी सुद्धा या अन्यायकारक ठरावाविरोधात एकत्र येऊन तो हाणून पाडण्यासाठी तीव्र विरोध दर्शवावा. महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी या ठरावाला कडाडून विरोध केला नाही आणि हा प्रस्ताव मंजूर झाला, तर कोल्हापूरची जनता हे कधीही सहन करणार नाही.

हे कसले हिंदुत्व?

यावरून हेच सिद्ध होईल की, महानगरपालिकेतील सगळेच नगरसेवक हिंदू पर्यटकांविरोधातील या आर्थिक षडयंत्रात आणि लुटीमध्ये सहभागी आहेत आणि सर्व जण भ्रष्ट आहेत, असा थेट आणि स्पष्ट संदेश जनतेमध्ये जाईल. प्रशासनाने आणि नगरसेवकांनी लक्षात ठेवावे की, अंबाबाईचे दर्शन हे विनामूल्यच राहिले पाहिजे, अशी भूमिका हिंदू एकता आंदोलने मांडली आहे.

आंदोलनाचा इशारा

हा अन्यायकारक कर लादण्याचा प्रयत्न केला, तर हिंदू एकता आंदोलन याविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र लोक आंदोलन छेडेल आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन व नगरसेवकांची असेल. जागरूक व्हा, एकत्र या आणि या लुटीला कडाडून विरोध करा,असे आवाहन करण्यात आले आहे. या तातडीच्या बैठकीला हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हा अध्यक्ष दीपक देसाई, विलास मोहिते, हिंदूराव शेळके,
वैभव कवडे, सुधारक वडगावकर, बाबु साखळकर, अनिरुद्ध कोल्हापूरे, केदार मुनिश्वर, अनिकेत पवार यांसह
हिंदू एकता आंदोलन चे प्रमुख पदाधिकारी आणि शहरातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते.