कोल्हापूर : कोल्हापूर शहर स्मार्ट करण्याचा संकल्प महापालिकेतील महायुतीच्या सत्ताधाऱ्यांनी केला आहे. यातूनच महापौर रूपाराणी निकम यांच्या संकल्पनेतून पुढे आलेला एक स्मार्ट प्रकल्प कोल्हापुरात राबवला जाणार आहे. यासाठी थेट आयआयटी मंडी या अग्रगण्य संस्थेची सोमवारी एक महत्त्वपूर्ण करण्यात आला आहे. यातून कोल्हापूरचा शाश्वत विकास घडेल असा दावा करण्यात आला आहे.

आयआयटी मंडीने गतवर्षी नवरात्र उत्सवात महालक्ष्मी मंदिरात तर अलीकडे दख्खनचा राजा जोतिबा मंदिरात एआय (कृत्रिम बुद्धिमत्ते ) आधारे गर्दीचे व्यवस्थापन उत्तमरीत्या हाताळले होते. या संस्थेचा हा अनुभव लक्षात घेऊन याच संस्थेशी

कोल्हापूर महानगरपालिका शहराच्या शाश्वत विकासासाठी तांत्रिक मार्गदर्शन घेण्याचा निर्णय आहे. यासाठी सोमवारी महानगरपालिका व आयआयटी मंडी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.   

सामंजस्य करार प्रसंगी संकल्पक महापौर रूपराणी निकम, आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड,उपमहापौर अक्षय जरग, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, आयआयटी मंडीचे डॉ. सत्त्वशील पोवार, डॉ. अमित शुक्ला,हर्षवर्धन साळुंखे उपस्थित होते.

स्मार्ट सिटीकडे पाऊल

देशातील विविध स्मार्ट सिटी प्रकल्पांमध्ये आयआयटी संस्थांचे तांत्रिक सहकार्य घेतले जाते. शहरी नियोजन, कृत्रिम बुद्धिमत्ता, विदा विश्लेषण, पर्यावरण व्यवस्थापन या क्षेत्रांतील आयआयटीचा अनुभव कोल्हापूरच्या विकासासाठी उपयुक्त ठरणार असल्याचा दावा महापालिकीने केला आहे.

कशासाठी उपयुक्त?

आयआयटी मंडी कडून मिळणारे तांत्रिक मार्गदर्शन हे करवीर नगरीतील सुरक्षित शहर प्रकल्प, एआय आधारित देखरेख प्रणाली, आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था, वाहतूक व्यवस्थापन, पर्यटन स्थळांवरील गर्दी व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण,  कचरा व्यवस्थापन, वाहनतळ सुविधा आधी कामांसाठी वापरात आणले जाणार आहे. कोल्हापूर महानगरपालिकेचा हा निर्णय केवळ एक सहकार्य नसून शहराच्या भविष्यासाठी दिशादर्शक ठरणारा परिवर्तनाचा टप्पा आहे. यामुळे कोल्हापूर शहर अधिक सुरक्षित, आधुनिक, पर्यावरणपूरक आणि नागरिक-केंद्रित बनणार असून, महाराष्ट्रातील एक आदर्श स्मार्ट शहर म्हणून उदयास येण्याचा मार्ग अधिक सुलभ होणार आहे, असेही महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

पूर्वीचा अनुभव कसा राहिला?

आयआयटी मंडीने यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय सोबतच्या सहकार्य अंतर्गत नवरात्र उत्सवात अंबाबाई मंदिर परिसरात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली यशस्वीपणे राबविली होती. तसेच अलीकडील जोतिबा यात्रेतही ही प्रणाली प्रभावीपणे वापरण्यात आली. या दोन्ही उपक्रमांना प्रशासन, नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून गर्दी व्यवस्थापन अधिक सुरक्षित व सुकर झाले आहे.