कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या ताब्यात स्वच्छता करणारे आठ वाहने सोमवारी दाखल झाली. या ८ रोड स्विपिंग मशिन्स प्राप्त झाल्या असून यची एकूण किंमत रुपये ३ कोटी ७१ लाख रुपये आहे. स्विपिंग ब्रशची लांबी २.५ मीटर असून ही मशिन ताशी सुमारे ५ किलोमीटर अंतरावरील रस्त्यांची प्रभावी स्वच्छता करू शकते. महायुतीची सत्ता महानगरपालिकेत आल्यानंतर केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने कोल्हापूर शहर विकासासाठी विविध सकारात्मक निर्णय घेतले जात आहेत. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत प्राप्त झालेल्या ८ रस्ता स्वच्छता वाहने (रोड स्विपिंग मशिन्स ) शहराच्या स्वच्छतेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
स्वच्छ कोल्हापूर या शहरवासीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोमवारी केले. कोल्हापूर महानगरपालिकेस स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत प्राप्त झालेल्या आधुनिक व्हेईकल माऊंटेड रोड स्विपिंग मशिन्सचे लोकार्पण पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडीक, आमदार अमल महाडीक, महापौर रुपाराणी निकम, आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड उपस्थित होते.
महापालिकेत सत्ता स्थापन करताना महायुतीने जाहीर केलेल्या विकास अजेंड्यातील शहर स्वच्छता, रस्ते विकास व अन्य मूलभूत सुविधा यासंदर्भातील आश्वासने पूर्ण करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने विविध विकासकामे राबविण्यात येत असल्याचेही प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. यानंतर यातील एका मशिनची सासने मैदान ते डी मार्ट या रोडवर सर्व मान्यवरांच्या समोर प्रात्यक्षिक घेण्यात आले. सदरचे मशिन आजपासून शहरातील मुख्य रस्ते स्वच्छतेसाठी वापरण्यात येणार आहेत.
कामगार वारसांना नियुक्तीपत्रे
कोल्हापूर महानगरपालिकेतील झाडू/सफाई कामगार पदावरील दिवंगत, वैद्यकीय कारणास्तव सेवानिवृत्त अथवा स्वेच्छानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार अनुकंपा तत्त्वावर आज पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली. नियुक्ती आदेशास महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी नुकतीच मंजुरी दिली आहे.
सार्वजनिक स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन विभागातील रिक्त पदांवर ही नियुक्ती करण्यात आली असून नियुक्त उमेदवारांना झाडू कामगार व सफाई कामगार पदांवर नियुक्ती देण्यात आली आहे. या उमेदवारांची सेवा ही आदेशातील अटी व शर्तींच्या अधीन राहणार असून त्यांना एक वर्षाचा परिविक्षा कालावधी लागू राहणार आहे. या नियुक्तीमुळे महापालिकेच्या स्वच्छता यंत्रणेलाही आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.
