कोल्हापूर : इंटरनेट कॅफे म्हणजे माहिती मिळवण्याचे एक आधुनिक दालन. त्याचा वापर करून अनेक तरुणांनी करिअर फुलवले आहे. पण याचा गैरवापर करणारे महाभाग कमी नाहीत आणि तसे करून देणारे गल्लाभरू चालक कमी नाहीत. असाच एक कॅफे कोल्हापूर जिल्ह्यात निर्भया पथकाच्या कारवाईने उघडकीस आला आहे.

इचलकरंजी येथील एका कॅफेची एक छोटेखानी खोली चक्क तासाभरासाठी साडेतीनशे रुपये आकारून वापरायला दिली जात होती. येथे तरुण-तरुणींचे अश्लील चाळे चालत असे. विशेष म्हणजे येथे कंडोम सारखे गर्भ निरोधक सापडले आहेत. यामुळे कारवाई करणारे पथक चक्रावून गेले आहे. कॅफेचा वापर नेमका कशासाठी होतो यावरच या निमित्ताने प्रश्नचिन्ह लागले आहे.

इंटरनेट कॅफे हे आधुनिक काळातील माहिती संशोधनाचे एक चांगले केंद्र बनले आहेत. इंटरनेट कॅफे (सायबर कॅफे) म्हणजे अशी जागा जिथे शुल्क भरून इंटरनेट वापरता येते. जलदगती इंटरनेट, संगणक उपलब्ध असतात. अनेकदा नाश्ता व इतर सेवा मिळतात. संगणक, वाय-फाय, प्रिंटिंग आणि ऑनलाइन अर्ज भरणे यांसारख्या सुविधा उपलब्ध असल्याने याचा उपयोग माहिती मिळवण्यासाठी, संवाद साधण्यासाठी किंवा खेळ खेळण्यासाठी होतो. ज्यांच्याकडे घरी संगणक, लॅपटॉप इंटरनेट नाही असे तरुण-तरुणी कॅफेमध्ये जाऊन जलद गती इंटरनेटचा वापर करून संगणकाच्या आधारे नवीन नवीन माहिती शोधणे, शाळेतील अभ्यास, संशोधनची कामे करीत असतात. परंतु या कॅफेचा गैरवापर करणारे चालकही आहेत. आणि त्याचा दुरुपयोग करणारे तरुण तरुणी अनेक आहेत. तेच या कारवाईच्या जाळ्यात सापडले आहेत.

इचलकरंजी शहरातील झेंडा चौक परिसरातील या प्रसिद्ध ‘कॅफे’ वर निर्भया पथकाने शनिवारी अचानक कारवाई करत मोठा गैरप्रकार उघडकीस आणला आहे. शहरात कॅफेंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी काही ठिकाणी बेकायदेशीर आणि अश्लील प्रकार सुरु असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार निर्भया पथकाने तोतया ग्राहक बनून कॅफेमध्ये प्रवेश केल्यानंतर वरील धक्कादायक बाबी समोर आल्या.

या कॅफेमध्ये जोडप्यांसाठी स्वतंत्र दोन रूम, वाढदिवस साजरा करण्यासाठी वेगळी रूम आणि विशेष म्हणजे ३५० रुपयांत एकांतवासाठी खोली भाड्याने दिली जात असल्याचे पोलीस कारवाईत समोर आले. या कॅफेमध्ये पथकाने छापा मारल्यानंतर कारवाईदरम्यान कॅफेमध्ये उपस्थित तरुण-तरुणींची एकच धावपळ उडाली. काही कॉलेज विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच बाहेरगावातून आलेले ग्राहकही या ठिकाणी आढळले.

या प्रकरणी संबंधित कॅफे मालक आणि कॅफे चालक यांच्यावर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईची माहिती कळताच शहरातील अनेक कॅफे चालकांनी गावभाग पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी केली.